धक्कादायक! मजुरी बुडू नये म्हणून 30 हजार महिलांनी काढले गर्भाशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मासिक पाळीच्या काळात मोलमजुरी करता येत नाही. त्यामुळे रोजंदारी बुडत असल्याने मराठवाडय़ात मोठय़ा प्रमाणावर महिला गर्भाशय काढत आहेत. अशा प्रकारे 30 हजार महिलांनी गर्भाशय काढले असल्याची बाब महिला व बालविकास मंत्री नितीन राऊत यांच्या निदर्शनास आली आहे.

ग्रामीण भागात मासिक पाळीच्या काळात महिला काम करीत नाहीत. विशेषतः मराठवाडय़ात ऊसतोड महिलांना मासिक पाळीच्या काळात काम करता येत नाही. यामुळे त्या दिवसाच्या मजुरीचे पैसे बुडत असल्याने यावर तोडगा म्हणून महिलांनी गर्भाशयच काढून टाकले आहे. याची दखल महिला व बालविकास मंत्री नितीन राऊत यांनी घेतली असून ही बाब त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे कळविली आहे.

याबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार एक समिती नेमण्यात आली होती. माझ्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीमध्ये आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांचाही समावेश होता. या समितीने मराठवाडय़ातील महिलांच्या आरोग्य प्रश्नांबाबत एक अहवालच जून 2019 ला राज्य सरकारला सादर केला आहे. या अहवालात संबंधित विभागांना यावर उपाययोजना करण्यासाठी सूचनाही करण्यात आल्या होत्या. त्यानुसार तसे शासन निर्णयही प्रत्येक विभागासाठी जारी करण्यात आले होते. नवीन सरकारनेही याची गंभीर दखल घेतली असल्याचे डॉ. नीलम गोऱहे म्हणाल्या.