छावण्यांमध्ये चार लाख पशूधन

सामना प्रतिनिधी। बीड

दुष्काळात होरपळणाऱया बीड जिह्यात चारा छावण्यांची संख्या 560 च्या घरात पोहचली आहे. या सर्व छावण्यांमध्ये शेतकऱयांनी आजमितीस तब्बल 4 लाख 2 हजार 602 जनावरे या छावणीच्या दावणीला बांधली आहेत. याठिकाणी लहान मोठय़ा पशूंना चारा पाण्याची व्यवस्था केली जात आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने 921 चारा छावण्यांना मंजूरी देण्यात आली असली तरी नियमाचे उल्लंघन करणाऱया 268 चारा छावण्या यापुर्वीच बंद करण्यात आलेल्या आहेत.

यंदा दुष्काळामुळे बीड, आष्टी आणि गेवराई या तीन तालुक्यात परिस्थिती गंभीर झाल्याने या तालुक्यातून सर्वाधिक छावण्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱयांकडे आले होते. बीड तालुक्यातून 316 छावण्यांना मंजूरी देण्यात आली. यापैकी 186 छावण्या सुरु असून यामध्ये 1 लाख 30 हजार 3 पशुधन ठेवण्यात आले आहे. तर आष्टी तालुक्यात 311 चारा छावण्यांना मंजूरी देण्यात आली होती. यापैकी 185 छावण्या कार्यरत असून यामध्ये 1 लाख 15 हजार 964 पशुधन आहे. तसेच गेवराई तालुक्यात 74 छावण्यांना मंजूरी देण्यात आली होती. यापैकी 56 चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 39 हजार 474 पशुधनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर बीड तालुक्यातील 108, आष्टी तालुक्यातील 115 आणि अंबाजोगाई तालुक्यातील 22 चारा छावण्या विविध कारणांमुळे बंद करण्यात आल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांबरोबरच पशुधनालाही भटकंती करण्याची वेळ आली असून यापुढील काळात ऊस तोडणीसाठी गेलेले मजूर परतीच्या मार्गावर असल्याने या मजूरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे मोठे आवाहन प्रशासनापुढे राहणार आहे. जिह्यातील अंबाजोगाई, धारुर, परळी आणि माजलगाव या चार तालुक्यात चाऱयाचा प्रश्न गंभीर नसल्याचे दिसून येत असल्याने या ठिकाणी चारा छावण्यांची संख्याही कमी आहे.

गतवर्षी सरासरीच्या केवळ 50 टक्केच पाऊस पडल्यामुळे जनावरांच्या चाऱयासह पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाच्या वतीने पशुधनासाठी चारा छावण्यास सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. मागील आठवडय़ात वादळी वाऱयासह गारपीट झाली होती. दरम्यान यामध्ये जनावरांसाठी उभे करण्यात आलेल्या शेडचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे पशुधनाबरोबर पशुपालकांचीही गैरसोय झाली. वाढत्या उष्णतेमुळे छावणीत असलेल्या पशुधनाला निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी धावपळ सुरू आहे.