बीड, परळीला कोरोनाचा विळखा, 50 कोरोनाबाधित रूग्ण

605

बीड जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुचा झपाट्याने प्रसार होऊ लागला आहे. बीड शहराला आणि परळी शहराला कोरोनाने विळख्यात घेतले आहे. काल रात्री आलेल्या अहवालामुळे बीड शहरामध्ये 26 तर परळी शहरामध्ये पुन्हा 14 रूग्ण सापडले. जिल्ह्यात रात्री 50 कोरोनाबाधित रूग्ण सापडले. एकुण रूग्णांची संख्या 781 च्या घरात पोहचली आहे.

बीड जिल्ह्यामध्ये काल 573 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणीचा अहवाल रात्री अकराच्या सुमारास प्राप्त झाला. त्यामध्ये 50 जण कोरोनाबाधित आढळले आहेत तर 523 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या 50 कोरोनाबाधित रूग्णांमध्ये बीड शहरामधील 26, परळी शहरातील 14, गेवराईतील 3, धारूर 2, अंबाजोगाई 4, माजलगाव 1 असा समावेश आहे. रोज बीड आणि परळी शहरातील रूग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. ही वाढ चिंता व्यक्त करायला लावणारी आहे. बीड जिल्ह्यामध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या 781 वर जावून पोहचली आहे. 416 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 336 जणांवर कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकीकडे रूग्ण वाढत असताना रूग्णांच्या मृत्युचे प्रमाणही वाढू लागले आहे. कोरोनामुळे रूगणांचे मृत्यू वाढत असल्याने जिल्ह्यामध्ये धास्ती निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 14479 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या घेण्याचे प्रमाणही वाढविण्यात आले आहेत. 13748 जणांचे अहवाल आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत. बीड शहरातील अनेक भागामध्ये आता कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने अर्धे शहर कंटेनमेंट झोन झाले आहे. काल रात्री 26 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांचा शोध घेणे सुरू आहे. शनिवारी पुन्हा मोठ्या प्रमाणावर स्वॅब घेतले जाणार आहेत. नागरिकांना सतर्क आणि सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळावी, मास्कचा वापर करण्यात यावा असे आवाहनही करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या