
बीड जिल्ह्यासह सबंध राज्यांचं लक्ष लागलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शनिवारी निवड होत आहे. या करिता भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात कांटे की टक्कर होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राज्याप्रमाणेच बीड जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी आग्रही आहे. या करिता नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे हे प्रयत्न करत आहेत. ते निवड प्रक्रिया होईपर्यंत बीडच्या विश्रामगृहावर बसून राहणार आहेत, तर राष्ट्रवादीच्या विजयाच्या चाव्या शिवसेनेच्या हातात असणार आहेत.
बीड जिल्हा परिषदेत शिवसेनेचे चार सदस्य असल्याने ते निर्णायक ठरणार आहेत. ते कोणाच्या बाजूने मतदान करणार यावरच राष्ट्रवादी अन भाजपा चे भवितव्य अवलंबून असणार आहे, शिवसेनेच्या चार सदस्याचे नेतृत्व बदामराव पंडीत हे करत आहेत, दोन्ही पक्ष त्यांच्या संपर्कात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुकन्या शिरसाट यांचं नाव अध्यक्ष पदासाठी निश्चित होत असून उपाध्यक्षांसाठी जयसिंह सोळुंके याच्या नावावर एकमत होत आहे, माजी मंत्री पंकजा मुंडे ह्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे, भाजपच्या उमेदवार म्हणून डॉ. योगिनी थोरात किंवा सारिका डोईफोडे यांच्या नावाची चर्चा होत आहे.
एकूण 60 सदस्य असलेल्या या जिल्हा परिषदेत दोन जिल्हा परिषद सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत तर सहा सदस्यांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क उच्च न्यायालयाने गोठविला आहे. त्यामुळे 52 सदस्यात ही निवड होत आहे. यात ही न्यायालयाने झालेल्या निवडीचा निकाल हा 13 जानेवारी पर्यंत जाहीर करू नये असा आदेश दिला आहे.
त्यामुळे आज निवड प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल हा राखून ठेवला जाणार आहे.
ही जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी विद्यमान मंत्री धनंजय मुंडे हे आपलं कौशल्य पणाला लावत आहे तर माजी मंत्री पंकजा मुंडे ह्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. परळीत झालेल्या पराभवानंतर जिल्हा परिषद हातातून गेल्यास भाजपासाठी तो मोठा धक्का असणार आहे. गत वेळेस राष्ट्रवादी कडे बहुमत असतांना आमदार सुरेश धस यांनी ऐन वेळी बंडाचे निशाण फडकवल्या मुळे राष्ट्रवादी ला अपयशाचा सामना करावा लागला होता, या वेळी आकड्याची जुळवा जुळवी कोणी केली हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी दोन्ही पक्षाला समान संधी उपलब्ध असल्याचे बोलले जाते.
52 सदस्य बीड मध्ये दाखल..
बीड जिल्हापरिषद ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी अन भाजपात मोठी चुरस पाहण्यास मिळत आहे, पुन्हा फोडाफोडीचे राजकारण रंगू नये घोडे बाजार होऊ नये म्हणून दोन्ही पक्षाने खबरदारी घेत 15 दिवसापासून आपल्या गटाचे सदस्य अज्ञात ठिकाणी पाठवले होते ते सर्व सदस्य रात्री उशिरा आप आपल्या सुरक्षित स्थळी दाखल झाले आहेत.


























































