बीड जिल्ह्यात अभूतपूर्व शुकशुकाट, जनता कर्फ्युतून जबाबदारीची जाणीव स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- बीड शहर

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आज जनता कर्फ्युचे आवाहन केले गेले या जनता कर्फ्युला प्रचंड अन उत्स्फूर्त प्रतिसाद बीड जिल्ह्याने दिला. अभुतपुर्व शुकशुकाट अन सन्नाटा असे चित्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहण्यास मिळत आहे. मात्र कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एक दिवसाची संचारबंदी पुरेशी नसल्याचे जाणकार बोलत आहेत. किमान पुढचे आठ दिवस अशी परिस्थिती कायम असावी. घराबाहेर पडू नका. गर्दी टाळा अन सुरक्षित राहा असे आवाहन आरोग्य प्रशासन करत आहे.

बीड जिल्ह्यात शनिवारपासूनच लॉक डाऊन झाले आहे. शनिवारी जीवनावश्यक वस्तूच्या दुकाना उघड्या होत्या. भाजी मार्केटमधील गर्दी वगळता जिल्ह्यात सन्नाटा होता. रविवारी जनता कर्फ्युच्या पार्शवभूमीवर सकाळ पासून जिल्हाभरात शुकशुकाट होता. जिल्ह्यातून गेलेले तिन्ही राष्ट्रीय महामार्ग अभूतपूर्व बंद होते. संपूर्ण जिल्ह्यात कर्फ्युचे पालन केले गेले. बीड शहरातील नेहमी वर्दळीचा सुभाष रोड इतिहासात पहिल्यांदाच शांत होता, नगर रोड, जालना रोड, बार्शी नाका रोड, पेठ बीड, धोंडीपुरा, बलभीम चौक, कारंजा रोड, सारडा कॅपिटल, जिजामाता चौक, डॉ आंबेडकर पुतळा परिसरात शुकशुकाट होता. नागरिक आपआपल्या घरात बसून होते. शहरातले सर्वच अपार्टमेंट शांत होते. वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. पोलीस प्रशासन सतर्क होते. आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सर्व कार्यालये बंद होती.

वडवणी – वडवणी शहरात सकाळ पासून जनता कर्फ्युचे पालन उत्स्फूर्त पणे झाले. संपूर्ण शहर निर्मनुष्य होते. ग्रामीण भागातून सकाळीच शहरात दाखल होणारा नागरिकांचा लोढा आज मात्र नव्हता.
अंबाजोगाई- सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या अंबाजोगाईमध्ये जनता कर्फ्यु जबाबदारीने पाळला गेला. योगेश्वरी देवीचे दर्शन चार दिवसांपासून बंद आहे. शाळा महाविद्यालयांना सुट्टी आहे. नेहमी गजबजलेले हे शहर आज पूर्णपणे ठप्प होते.
परळी – वैद्यनाथाची भूमी म्हणून ओळख असणाऱ्या परळी मध्ये कर्फ्युचे पालन झाले. संपूर्ण शहर स्तब्ध होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. नागरिक आपल्या घरात बंद होते.
केज – केजमधील रस्ते शनिवार पासून निर्मनुष्य होते रविवारी संपूर्ण शहर स्तब्ध होते. केज मधील वाहतूक ठप्प होती. ग्रामीण भागही पूर्णपणे बंद होता.
धारूर – धारूर मधील परिस्थिती या पेक्षा वेगळी नव्हती. सोन्याचांदीचे मार्केट चार दिवसापासूनच बंद आहे. बाजार पेठा मध्ये लॉक डाऊन होते . धारूर शहरात शनिवार पासूनच सन्नाटा होता.
माजलगाव – माजलगावमध्ये शनिवारी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागले होते. त्यानंतर गर्दी कमी झाली. रविवारी जनता कर्फ्युचे मात्र पूर्णपणे पालन झाले. शहरातून गेलेले दोन राष्ट्रीय महामार्ग ठप्प होते. गावात नागरिक आपल्या घरामध्ये बसून होते पोलिसांनी केलेल्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आष्टी- आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन ही तालुक्याच्या ठिकाणी शुकशुकाट पाहण्यास मिळाला. अगदी शेती सुद्धा निर्मनुष्य होती. रस्ते बंद होते. वाहतूक ठप्प होती. बस स्थानकवर सन्नाटा होता.
गेवराई- एरवी सर्वात गजबजलेले ठिकाण म्हणून ओळख असणारे गेवराई आज मात्र स्तब्ध होते. गेवराईतील सर्वच रस्त्यावर अभूतपूर्व शुकशुकाट होता. मैदान ओस पडले होते. महत्त्वाचे ठिकाण, चौक सुन्न होते, राष्ट्रीय महामार्ग ठप्प होता.

एक दिवसाचा कर्फ्यु पुरेसा आहे?
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सर्व जण सज्ज झाले आहेत. जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. आज जनता कर्फ्युचे पालन जबाबदारीने झाले. मात्र एक दिवसाचा कर्फ्यु पुरेसा नाही. काम नसेल तर जनतेने अजून आठ दिवस घरा बाहेर पडू नये, आप आपली दुकाने उघडू नये, आपले घर सोडू नये, सतर्कता पाळावी यातच सर्वांचे भले आहे. धोका ओढवून घेऊ नये, या संकटाचा सामना करायचा असेल तर फक्त घर सोडू नये असे आवाहन केले जात आहे.