
वाढत्या कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी गुरूवारी मध्यरात्री बीड जिल्ह्यात दहा दिवसासाठीचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. शुक्रवारचा लॉकडाऊनचा पहिला दिवस संपूर्ण जिल्हाभरात रस्त्यावर सन्नाटा होता. ठप्प वाहतूक, र्निमनुष्य रस्ते वर्षभरापूर्वीची आठवण ताजी करत होते. पोलिसांचा खडा पहारा चौकाचौकात होता. संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत होती.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने गुरूवारी मध्यरात्रीपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. गुरूवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली. शुक्रवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी रस्ते र्निमनुष्य होते. शहरासह ग्रामीण भागात सन्नाटा होता. पोलिसांचा खडा पहारा चौकाचौकात सुरू होता. तगडा पोलीस बंदोबस्त अंमलबजावणीसाठी तैनात करण्यात आला होता. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चौकशी केली जात होती. दूध विक्रेता आणि भाजीपाला विक्रेत्यांना दोन तासाचीं सवलत देण्यात आली होती. पोलिसांनी विनाकारण नागरिकांना वेठीस धरू नये, मारहाण करू नये अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या होत्या. त्याचीही अंमलबजावणी केली गेली. दोन तासासाठी जिवनावश्यक वस्तुंमध्ये येणाऱ्या किराणा दुकान मात्र व्यापाऱ्यांनी आज बंद ठेवल्या होत्या. लॉकडाऊनला विरोध म्हणून व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला होता. बीडसह गेवराई, वडवणी, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, पाटोदा, शिरूर, आष्टी, केज, धारूर या तालुक्यातही लॉकडाऊनला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पोलीस प्रशासनासह महसूल प्रशासनही अंमलबजावणीसाठी मेहनत घेतल्याचे दिसून येत होते. बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बीडच्या कुटे ग्रुप यांनी नाष्ट्याचे वाटप केले होते.




























































