
मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बीड जिल्ह्यात आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला बसल्याचे दिसून आले आहे. मनोज जरांगे पाटील हे जालना येथील अंतरवेली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेले होते.त्यांना समर्थन म्हणून आणि आत्तापर्यंत राजकीय पक्षांनी आरक्षण न दिल्याने राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर ग्रामपंचायत निवडणुका आल्याने आंदोलनाचा परिणाम थेट या निवडणुकांवर झालेला दिसून आला. बीड जिल्ह्यात 186 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.यामध्ये 16 ग्रामपंचायतमध्ये मतदारांनी बहिष्कार टाकल्याचे दिसून आले तर 12 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून उर्वरीत 158 ठिकानी मतदान प्रक्रिया पार पडली.
वरील ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र मतदारांनी बहिष्कार टाकलेल्या गावात उमेदवारासाठी कोणताही अर्ज न आल्याने या ठिकाणी मराठा आरक्षणाचा परिणाम झाल्याचे दिसून आले. निवडणुकीत सरपंच पदाकरिता 531 उमेदवार तर सदस्य पदासाठी 3 हजार 236 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यात 561 मतदान केंद्र असून तीन लाख मतदार हक्क बजावणार आहेत. उद्यासोमवारी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.



























































