
मुलांच्या भविष्यासाठी तजवीज म्हणून शेत विकून आलेले साडे अकरा लाख रुपये मल्टिस्टेट बँकेत मुदत ठेवीच्या रूपात ठेवले. वारंवार चकरा मारूनही मुदत ठेव परत मिळत नसल्यामुळे हतबल झालेल्या शेतकर्याने बँकेच्या दारातच गळफास घेतल्याची संतापजनक घटना बीड जिल्ह्यात गेवराई येथे घडली. या प्रकरणी बँकेच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील सुरेश आत्माराम जाधव (४६) हे अल्पभूधारक शेतकरी. त्यांच्याकडे साडेतीन एकर जमीन होती. त्यापैकी तीन एकर जमीन विकून आलेले साडेअकरा लाख रुपये २०२० मध्ये गेवराईच्या छत्रपती मल्टिस्टेट बँकेत तसेच पाच लाख रुपये ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवले. मुलगी साक्षी (२१) आणि मुलगा शुभम (१८) यांच्या भविष्याची तरतूद म्हणून त्यांनी ही तजवीज करून ठेवली होती. आता साक्षीचे लग्न ठरले तसेच ती ‘नीट’ची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. त्याचबरोबर मुलगा शुभम हा सीईटीची तयारी करत असल्याने त्यांना पैसे परत हवे होते.
दोन वर्षांपासून सुरेश जाधव यांनी बँकेच्या खेट्या घातल्या. परंतु बँक प्रशासनाने त्यांना दाद दिली नाही. शेवटी कंटाळून सहा महिन्यांपूर्वी त्यांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे बँकेने त्यांना कसेबसे अडीच लाख रुपये परत केले. नऊ लाख रुपये परत मिळावेत म्हणून सुरेश जाधव यांनी पुन्हा बँकेच्या खेट्या घालायला सुरुवात केली. परंतु बँकेच्या निष्ठूर प्रशासनाला त्यांची दया आली नाही.
मॅनेजरला मेसेज करून गळफास घेतला…
सुरेश जाधव हे छत्रपती मल्टिस्टेट बँकेत खेट्या घालून थकले होते. अखेर त्यांनी मंगळवारी शाखा व्यवस्थापक ज्योती क्षीरसागर यांना व्हॉट्सअॅपवर ‘माझ्या मुलांच्या शिक्षणाचे वाटोळे केल्याबद्दल धन्यवाद! एवढा अंत एखाद्याचा बघू नये. खरी परिस्थिती जाणून घ्यायला हवी होती. मी तुमच्यासमोर आत्महत्या करत आहे. हा निरोप चेअरमन संतोष भंडारी यांना द्या’ असा मेसेज केला. त्यानंतर विमनस्क अवस्थेत त्यांनी बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
छत्रपती मल्टिस्टेट बँकेच्या गेटलाच सुरेश जाधव यांनी गळफास घेतल्याचे कळताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी पंचनामा केला; परंतु नातलगांनी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी बँकेचे अध्यक्ष संतोष भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतरच नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतला. गुन्हा दाखल होताच संतोष भंडारी फरार झाले आहेत.
पैसा गेला, बापही गेला…
सुरेश जाधव यांची मुलगी साक्षी ही नुकतीच ‘नीट’ची परीक्षा उत्तीर्ण झाली असून तिला 222 गुण मिळाले आहेत. साक्षीला बीएचएमएसला प्रवेश मिळण्याची शक्यता होती. ‘‘माझा भाऊ सीईटीची तयारी करत आहे. त्यासाठीच पैसे हवे होते. आम्ही बँकेत चकरा मारल्या. परंतु तेथील व्यवस्थापकांनी अपमानास्पद वागणूक दिली आणि बँकेतून काढून दिले. पैसेही मिळाले नाहीत आणि बापाचे छत्रही हरवले, आम्ही आता काय करायचे?’’ असे पाणावलेल्या डोळ्यांनी साक्षीने विचारले. आमच्या भविष्यासाठी वडिलांनी जमीन विकली. आता एक एकरच जमीन उरली आहे. त्यावर तिघांचे पोट कसे भरणार? असा प्रश्नही तिने केला.
लोकांनी पैसे ठेवताना त्या संस्थेची विश्वासार्हता तपासली पाहिजे. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी लोकांनी पोलिसांशी संपर्क करायला हवा, म्हणजे आम्ही काही मदत करू शकू.
– नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक