कोविड वॉर्डात 2 रूग्णांच्या वादात तिसऱ्या रूग्णाचा मृत्यू, बीडच्या शासकीय रुग्णालयातील घटना

बीड जिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये कोविड वार्डात काल सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान दोन कोरोना रूग्णांमध्ये वादावादी झाली. या वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले आणि शेजारी दाखल असलेल्या 55 वर्षीय वृद्ध महिलेच्या कॉटवर जावून पडल्यामुळे ही वृद्ध महिला कॉटवरून खाली पडली. यात तिचा मृत्यू झाला.

बीड जिल्हा रूग्णालयातील कोविड कक्षामध्ये काल रात्री दहाच्या दरम्यान दोन रूग्णांमध्ये किरकोळ कारणावरून भांडणाला सुरूवात झाली. ही भांडणे नंतर विकोपाला गेली. मारामारी करत असताना हे दोन्ही रूग्ण रूक्मिणबाई मजमुले (55) या रूग्णाच्या कॉटवर जावून पडल्यामुळे सदरची महिला कॉटवरून खाली फरशीवर पडली. त्यामुळे या महिलेच्या डोक्याला मार लागून तिचा मृत्यू झाला.

याबाबत जिल्हा रूग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राठोड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून सत्य परिस्थितीचा अहवाल देण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या