थंडीने कुडकुडत उपोषणकर्त्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीव सोडला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोडाफोडी आणि महामानवांचा अपमान करण्यात गुतलेल्या मिंधे सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही. महसूल प्रशासन निष्क्रियतेमुळे फाईल लाल फितीत अडकल्याने सामान्यांचे हाल होत आहेत. त्यातच घरकुलाचे बांधकाम पूर्ण करावे व थकलेले हप्ते मिळावेत या मागणीसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या उपोषणार्थीची दखल न घेतल्याने त्याचा आज रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संतापलेल्या मृताच्या नातेवाईकांनी मागणी मान्य होईपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने प्रशासन गोंधळात पडले. मात्र आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृताच्या पाथ्र्विावर अंत्यसंस्कार केले. मात्र या घटनेने सरकारच्या भोंगळ कारभार एैरणीवर आला असून, सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

अप्पाराव भुजाराव पवार हे वासनावाडी येथील रहिवासी असून, ते दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. शासनाने मंजूर केलेले घरकुल तातडीने बांधून देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी पवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषणास बसले होते. मात्र, या त्यांची साधी दखल घ्यायलाही जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह प्रशासनाला वेळ मिळाला नाही.

दरम्यान, पवार यांचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पवार यांचा मृतदेह दोन ते तीन तास उपोषणस्थळीच होता, ना तिथे पोलीस आले ना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, ना जिल्हा प्रशासनातील अधिकारी. पवार यांच्या मृत्युला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. वारंवार निवेदने आणि अर्ज देऊनदेखील त्यांच्या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले, त्यामुळेच त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली आणि अखेर थंडीने कुडकुडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या उपोषणकर्त्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी टाहो फोडला.

अखेर जिल्हाधिकार्‍यांना जाग आली

घरकुलासाठी अप्पाराव पवार यांनी आपला देह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवला. या घटनेने कडाक्याच्या थंडीत प्रशासनाला घाम फुटला. अप्पारावच्या मृत्यूनंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा खडबडून जागे झाले. पवार कुटुंबाच्या घरकुलासाठी व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकार्‍यांनी उद्या सोमवारी दुपारी अधिकार्‍यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पवार कुटुंबाला न्याय मिळेल, मात्र त्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाला बलिदान द्यावे लागले. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, अशी भूमिका अप्पाराव यांचा मृतदेह ठेवून नातेवाईकांनी घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू झाली. मात्र, मध्यस्थी करून पवार कुटुंबाची समजूत काढल्यानंतर अप्पाराव यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.