
लॉकडाऊनच्या काळात सामान्य कुटूंबाची परवड होऊ नये, कोणी उपाशी राहू नये म्हणून सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना अनेक सामाजिक संस्था मदतीचा हात देण्यासाठी पुढे येत आहेत. बीड मध्ये मोरया प्रतिष्ठानने 750 कुटुंबाना धान्य वाटप केले आहे. दोन दिवसांपूर्वी 400 कुटुंबाना तर आता 350 कुटूंबाना धान्य वाटप करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. समाजातील काही घटक ज्यांना रोज काम करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो, अश्या लोकांचे रोजगार बंद झाल्याने उपासमारीची वेळ येत आहे. शासनामार्फत स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळेल तेव्हा मिळेल, पण आज त्यांच्या उपासमारीची तीव्रता पाहता मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या सक्रिय सहभागातून पहिल्या टप्यात 400 तर दुसऱ्या टप्प्यात 350 गरजू कुटुंबीयांना प्रतिकुटुंब 5 किलो तांदूळ व 1 किलो डाळ अशा स्वरूपात धान्य वाटप करण्यात आले. सदरील मदत कार्य करण्यासाठी मोरया प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मोलाचा हातभार लावला.
येत्या दोन दिवसात पुढच्या टप्प्यात प्रभाग क्र. 3 मधील पुनर्वसन कॉलनी व हनुमान नगर येथील हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांना धान्य स्वरूपात मदत करण्यात येणार असल्याचे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी कळवले आहे.





























































