Beed News – आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर कार-टिप्परची धडक; माय-लेकराचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर आज (27 मार्च 2026) एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. भरधाव टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर कारने पेट घेतला. या आगीत कारमधील माय-लेकराचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये आष्टी पंचायत समितीचे ग्रामसेवक तथा प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज यांच्या पत्नी आणि मुलाचा समावेश आहे.

मूळचे केज तालुक्यातील साळेगाव येथील रहिवासी असलेले ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज हे सध्या आष्टी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी त्यांची पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी (वय 42) आणि मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी (वय 25) हे दोघे कारने आष्टीकडून बीडकडे काही कामासाठी जात होते. दुपारी कापसी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव टिप्परने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, कारचा चेंदामेंदा झाला आणि काही क्षणांतच गाडीने पेट घेतला. आगीचा भडका मोठा असल्याने माय-लेकराला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या भीषण दुर्घटनेत दोघांचाही जागीच अंत झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कारचे पत्रे कापून आणि आग विझवून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला तब्बल दीड ते दोन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अपघाताची भीषणता पाहून घटनास्थळावरील लोकांच्या डोळ्यांत पाणी आले. मृत ऋषिकेश हा उच्चशिक्षित होता. त्याने नुकतेच सी.ए. (Chartered Accountant) चे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो आपल्या करिअरची सुरुवात करत होता. आपल्या पायावर उभे राहून कुटुंबाला आधार देण्याचे त्याचे स्वप्न या एका अपघाताने क्षणात धुळीस मिळवले.

ज्यावेळी ही हृदयद्रावक घटना घडली, त्यावेळी श्रीहरी पुरी महाराज एका गावामध्ये कीर्तनाच्या कार्यक्रमात व्यस्त होते. समाजाला उद्बोधन करणाऱ्या महाराजांच्याच संसारावर काळाने असा घाला घातल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

“शिक्षण पूर्ण करून कर्तृत्वाच्या शिखराकडे निघालेला मुलगा आणि त्याला साथ देणारी आई, दोघांचाही असा अंत होणे हे संपूर्ण जिल्ह्यासाठी चटका लावणारे आहे.” या घटनेमुळे साळेगाव आणि आष्टी परिसरात मोठी शोककळा पसरली असून, अपघातग्रस्त टिप्पर चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.