गर्भाशय काढण्याच्या शस्त्रकियांबाबत तपासणी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। बीड

ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया झाल्या. यावर विधान परिषदेत चर्चा झाली. त्या अनुषंगाने आ.डॉ.निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती आरोग्य विभागाने गठीत केली आहे. ही समिती बीड जिल्ह्यातील खासगी रूग्णालयामध्ये गेल्या तीन वर्षात गर्भाशय काढून टाकण्याच्या किती शस्त्रक्रिया झाल्या यांची तपासणी करणार आहे.

बीड जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. राज्यभर या प्रकरणाने खळबळ उडवून दिल्यानंतर 18 जून रोजी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून त्यावर चर्चा झाली. त्याचवेळी आरोग्यमंत्र्यांनी राज्यस्तरावर महिला आमदार व विशेषतज्ञांची समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार 26 जून रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने सात सदस्यfय समिती गठीत केली आहे. त्यामध्ये अध्यक्ष आ.डॉ.निलम गोऱ्हे, आ.विद्या चव्हाण, मनिषा कायंदे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील विभाग प्रमुख, युनिसेफचे सल्लागार डॉ.कर्नाटकी आणि सदस्य सचिव म्हणून आरोग्य सेवा संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती बीड जिल्ह्यातील खाजगी रूग्णालयात गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया संदर्भात तपासणी करणार आहे.

गेल्या तीन वर्षामध्ये ज्या खाजगी रूग्णालयामध्ये या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. त्याची तपासणीही केली जाणार आहे. शस्त्रक्रिया केलेल्या महिलांच्या संदर्भाने तांत्रिक अभ्यास प्रत्यक्षात काही महिलांच्या मुलाखती ही समिती घेणार आहे. रूग्णालयांमार्फत अनावश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत किंवा कसे? याबाबतचा अभ्यास करणार असून अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांवर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे.