बीडमध्ये 440 टीम तयार करणार, ऑपरेशन कॉन्टॅक्ट ट्रेस राबवणार

फोटो- प्रातिनिधीक

बीड – अजून एकही रुग्ण न सापडलेल्या बीड जिल्ह्याची धडधड आता वाढली आहे, कारण आज काही तपासणीचे अहवाल प्राप्त होणार आहेत. त्या अनुषंगाने प्रशासन सतर्क झाले आहे. आरोग्य विभागाच्या 440 टीम सज्ज ठेवण्यात येणार आहेत. लागण झालेला एकही रुग्ण उघडकीस आला तर त्या भागातील 3 किमी परिसरात कॉन्टॅक्ट सर्च प्लॅन राबवावा लागणार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे, असे जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी म्हंटले

बीड जिल्ह्यात जिल्हाप्रशासन आणि आरोग्य प्रशासन दिवस रात्र परिश्रम घेत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. अजून एकही रुग्ण कोरोना ग्रस्त रुग्ण सापडला नसला तरी संभाव्य धोका ओळखून आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. तब्बल 440 टीम तयार आहेत. प्रत्येक तालुक्यात 40 टीम हे ऑपरेशन राबवणार आहेत. प्रत्येक टीममध्ये 4 कर्मचारी असणार आहेत यात आरोग्य खात्याचा एक कर्मचारी, एक पोलीस खात्याचा आणि एक शिक्षक अशी असणार आहे. दहा टीमवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक वरिष्ठ डॉक्टर एक टेक्निशियन असणार आहे. सॅम्पल तपासणीचे काम विभागून दिले जाणार आहे. कोरोना लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यासाठी 3 किमी परिसराची शोध मोहीम राबवली जाणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार , पोलीस अधीक्षक हर्ष पोदार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात हे सतर्क आहेत, कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या