बीड – बलात्कारातील आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह, माजलगावात खळबळ

2364
corona-new

एक महिन्यापूर्वी एका विवाहितेला पुण्याला पळवून नेऊन बलात्कार करणारा आरोपीच चक्क कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी संपर्कात आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान येथील एका खाजगी दवाखान्यात गेवराई तालुक्यातील एका रुग्णाचा अनेक तास संपर्क आल्याने त्या दवाखान्यातील ९ जणांचे स्वॉब घेतले गेले आहेत.

तालुक्यातील जदीद जवळा येथील दोन मुलांचा पिता असलेल्या 26 वर्षीय तरुणाने चार मुलांची आई असलेल्या 30 वर्षीय महिलेला 17 जून रोजी पुणे या ठिकाणी पळवून घेऊन गेला. त्यानंतर 8 जुलै रोजी तो त्या महिलेला घेऊन पुण्याहून परत आला व ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. या वेळी महिलेने मला या व्यक्तीने पळवून नेऊन बलात्कार केल्याची फिर्याद दिली त्यावरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. 9 जुलै रोजी आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली .

दरम्यान आरोपी हा पुण्यावरून आल्यामुळे त्याचा स्वॉब दि. 13 जुलै रोजी घेण्यात आला त्याचा रिपोर्ट बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याने पोलीस दलात एकच खळबळ माजली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे 10 ते 15 अधिकारी कर्मचारी व होमगार्ड यांचा सदर व्यक्तीशी संपर्क आला होता तसेच न्यायालयात देखील संपर्क आला असण्याची शंका आहे. यातील पीडित महिलेचा देखील बुधवारी डॉक्टरांनी स्वाब घेतला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल परदेशी यांनी दिली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके यांनी सांगितले की, आमच्या कर्मचाऱ्यांचे स्वाब घेतले जाणार असून संपूर्ण पोलीस ठाणे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तर न्यायालयात या आरोपीला दोन वेळा हजर करण्यात आल्यामुळे न्यायालयाला देखील पत्राद्वारे कळविण्यात येत आहे असेही नरके यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या