
सामना प्रतिनिधी । बीड
सध्या वाळू उपसा जोरात सुरू आहे, वाळू माफियांच्या दादागिरीने महसूल विभाग ही हतबल झाले आहे, वाळू उपसा करून जड वाहनांच्या वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील वाहतूक रस्ते अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. याचा फटका गावागावातील जनतेला बसत आहे.
बीड जिल्ह्यात नदी पात्रातील वाळू उपसा एक डोके दुःखी झाली आहे. दिवसरात्र महसूल विभागाला डोळ्यात तेल घालून राखण करावी लागत आहे. तर अनेकदा वाळू माफियांच्या दादागिरीचा सामना करावा लागत आहे, वाळू उपसा करून होणाऱ्या वाहतुकीने रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक भागात चिखल असताना वाहतूक झाल्याने रस्ते उखडले आहेत. बीड तालुक्यातील रंजेगाव येथील परिस्थिती फारशी वेगळी नाही, वाळू वाहतुकीमुळे रस्त्याची वाट लागली आहे. गावात जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहिला नाही, उद्ध्वस्त झालेल्या रस्त्यामुळे ग्रामीणभागाचे हाल होत आहेत. या बाबत अनेकदा निवेदने देऊनही रंजेगाव ग्रामस्थांना न्याय मिळत नसल्याने ग्रामस्थ तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

























































