बीड-गेवराई बरोबर माजलगाव वर भगवा फडकविणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। माजलगाव

शिवसेनेने केलेली युती ही शेतकरी, सर्वसामान्य लोकांसाठी केली आहे,त्यामुळे आता शिवसैनिकानीं त्यासाठी पक्षाचे काम वाढवले पाहिजे, त्यासाठी आजच कामाला लागा,बीड तर आपलेच आहे,गेवराई मागतो आहे तर माजलगाव वरही शिवसेनेचा भगवा फडकविणार असे प्रतिपादन जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी केले. यावेळी संपदाताई गडकरी,बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक,सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत नवले यांची उपस्थिती होती.

बुधवारी येथील वैष्णवी मंगल कार्यालयात आयोजित शिवसेना माजलगाव विधानसभा मतदारसंघातील बुथप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यापूर्वी तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे तेलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते माजलगाव अशी वीस किलोमीटर शेकडो मोटारसायकलींची रॅली काढण्यात आली ,भगवे झेंडे लावलेल्या मोटरसायकलवर स्वार भगवे रुमाल गळ्यात घातलेले शिवसैनिक पाहून सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.

रॅलीनंतर मेळाव्यात उपस्थित शिवसैनिकाना मार्गदर्शन करताना जाधव म्हणाले की,पाया मजबूत असेल तर कळसावर झेंडा फडकवू,पक्ष वाढीसाठी आजी-माजी पदाधिकारी यांना मान द्या, मला कुठलीही गटबाजी चालणार नाही असे ठणकावून पद घेऊन पक्षाला फसवणाऱ्यांची दखल घेतली जाईल असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

या मेळाव्याचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केले, या मेळाव्यास बीड जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, बाळासाहेब अंबुरे,माजी तालुकाप्रमुख सतीश सोळंके,संघटक रामदास ढगे, उपजिल्हाप्रमुख सुशिल पिंगळे, उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके,महिला आघाडी तालुकाप्रमुख राजश्रीताई जाधव,चंद्रकला बांगर,प्रल्हाद सोळंके, धारुर तालुकाप्रमुख बाळासाहेब कुरुंद,विनायक ढगे, वडवणी तालुकाप्रमुख संदिप माने,नागेश डिगे,बाबासाहेब चाटे,सुनील खंडागळे, माजलगाव शहरप्रमुख धनंजय सोळंके, माजलगाव तालुका समन्वयक अशोक आळणे, नितीन मुंदडा, अॅड.दत्ता रांजवण, बाळासाहेब मेंडके, अभय मोहरिर, विक्रम शिंदे,सुरज एखंडे, अभिजित कोंबडे,सुरज गवरकर यांच्यासह मतदारसंघातील माजलगाव-वडवणी-धारूर या तिन्ही तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, शाखाप्रमुख, शिवसैनिकांनी या मेळाव्यास हजेरी लावली होती.

*बीड जिल्ह्यात फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला राबवावा–जिल्हाप्रमुख मूळूक

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे फिफ्टी-फिफ्टीचे समीकरण ठरले आहे,मग तसेच समीकरण बीड जिल्ह्यात राबवून जिल्ह्यातील विधानसभेचे अर्धे मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घ्यावेत अशी मतदारसंघातील शिवसैनिकांची भावना असल्याचे जिल्हाप्रमुख सचिन मूळूक यांनी सांगून माजलगाव मतदारसंघावर यापूर्वी शिवसेनेचे बंडखोर आमदार विजयी झाले होते, त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा भगवा फडकणार आहे,त्यामुळे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी लक्ष घालून बीड,गेवराई सोबत माजलगाव मतदारसंघ पक्षाला सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती त्यांनी केली.
* संपदा गडकरी *

उमेदवार कोणीही दिला तरी गट-तट विसरून काम करा व युतीचे उमेदवार निवडून आणा,महिलांनीही पक्षाचा रथ पुढे न्यावा ,हा मतदारसंघ पक्षकडेच राहिला पाहिजे यासाठी पक्षप्रमुख यांचेकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.