
देशाची अस्मिता असणाऱ्या आयएनएस विक्रांतच्या नावाखाली देशप्रेमी लोकांकडून गोळा केलेल्या रक्कमेची अफरातफर करून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी देशाशी गद्दारी केली आहे. अशा या देशद्रोह्यावर तात्काळ कारवाई करून अटक करावी या मागणीसाठी बीडमध्ये संतप्त शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांची प्रतिमेची गाढवावरून धिंड काढून त्याला चप्पलाने बदडले. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड घोषणाबाजीत शिवसेनेच्या या आंदोलनात शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांनीही सहभाग घेतला.
आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी भाजपाच्या किरीट सोमय्यांनी निधी गोळा करण्याची मोहिम सुरू केली. किरीट सोमय्याने आपल्या लोकांच्या माध्यमातून ठिकठिकाणी मदतीचे आवाहन करत मोठा निधी गोळा केला. देशाची अस्मिता असणारी आयएनएस विक्रांत भंगारात जावू नये या उद्देशाने नागरिकांनी सढळ हाताने मदत केली. मदत करताना या दानशूर व्यक्तींची देशभावना महत्वाची होती. किरीट सोमय्यांनी ज्या उद्देशासाठी रक्कम गोळा केली ती रक्कम सरकारकडे दिली नाही. तो पैसा राजभवनात जमा झालाच नाही मग तो गेला कुठे असा साधा सवाल उपस्थित करून सोमय्याला जाब विचाराला जात आहे. देशाच्या नावावर गोळा केलेला पैसा किरीट सोमय्यांनी खिशात घातल्याचे उघड झाल्याने बीडमध्ये शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.
आज शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देशद्रोही किरीट सोमय्यांची गाढवावरून धिंड काढली. संतप्त शिवसैनिकांनी सोमय्याच्या प्रतिमेला चप्पलाने बदडले. गद्दार, घोटाळेबाज, लालची किरीट सोमय्यावर तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी संतप्त शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, कुंडलिक खांडे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक संगीता चव्हाण, युवासेना जिल्हाधिकारी सागर बहीर, उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप, गणेश वरेकर, नितीन धांडे, बप्पासाहेब घुगे, सुनील सुरवसे, भाऊसाहेब लटपटे, अभिजित बरिदे, जयसिंग चुंगडे, नगरसेवक फारूक पटेल, अमर नाईकवाडे, शुभम धूत, किशोर जगताप, अलकाताई डावकर, आजीनाथ खेडकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.





























































