बीड जिल्हा परिषदेत भाजपने मैदान सोडले, पंकजांची ट्विटरवर पराभवाची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल येण्याअगोदरच भाजपने मैदान सोडले. ही निवडणूक भाजप केवळ औपचारिकता म्हणून लढवत आहे, असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज आपला पराभव मान्य केला.

बीड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी शनिवारी मतदान घेण्यात आले. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या मतदानाची मोजणी 13 जानेवारीला करण्यात येणार असून निकालही त्याच दिवशी जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकीअगोदर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होईल, असे बोलले जात होते. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी निकालाअगोदरच ट्विट करून पराभव मान्य केल्यामुळे जिल्हा परिषद भाजपच्या हातून निसटल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकूण साठ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत 53 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन सदस्य आमदार झाले असून पाच सदस्यांना न्यायालयाने अपात्र ठरवले आहे. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवकन्या सिरसाट, तर भाजपकडून योगिनी थोरात यांनी अर्ज दाखल केला. उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे, भाजपकडून भारत काळे यांनी निवडणूक लढवली.

निकाल 13 जानेवारीला

राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे बीडमध्ये तळ ठोकून होते. पंकजा मुंडे देशाबाहेर असल्याने खासदार डॉ. प्रीतम मुंडे बीडमध्ये दाखल झाल्या होत्या. या निवडीचा निकाल न्यायालयाच्या सुनावणीनंतर म्हणजे 13 जानेवारी रोजी समोर येणार आहे.