बेळगावात फडणवीस यांच्याविरोधात निदर्शने, एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांविरोधात प्रचारासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी येऊ नये, अशी सीमाभागातील मराठी बांधवांची मागणी आहे. मात्र भाजपच्या मराठी नेत्यांची फौज प्रचारात उतरली आहे. त्याचे तीव्र पडसाद आज बेळगावात उमटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगावात भाजपच्या प्रचारासाठी येताच त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करीत काळे झेंडे दाखवले. ‘गद्दार फडणवीस यांचा धिक्कार असो, महाराष्ट्रद्रोही फडणवीसांचा धिक्कार आसो’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी कानडी पोलिसांनी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होत आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. मराठी भाषिकांची जबरदस्त एकजुट दिसत असून, एकीकरण समितीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. काल बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाली. मराठी भाषिकांविरोधात प्रचार करताना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना लाज वाटत नाही का? असा खडा सवाल संजय राऊत यांनी केला होता. भाजप नेत्यांचा दुटप्पीपणाही त्यांनी उघड केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमाभागात सभा घेऊ नये, त्यांनी सभा घेतली तर मराठी भाषिक जनता त्यांना माफ करणार नाही, असे संजय राऊत यांनी काल सांगितले.

काळे झेंडे, घोषणाबाजी

टिळकवाडी परिसरात युवा समितीचे शुभम शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसांची पर्वा न करता निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या झटापटीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. फडणवीसांच्या सभेकडे जाणाऱया कार्यकर्त्यांना अडवले.