
पश्चिम बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. येथे एका कुटुंबातील सहा सदस्यांना पाणी समजून अॅसिड वापरून बनवलेले अन्न खाल्ल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जेवण जेवल्यानंतर घरातील तीन मोठ्या व्यक्तींसह तीन लहान मुलांची तब्येत बिघडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रत्नेश्वरबातीचे रहिवाशी असलेले आणि व्यवसायाने सोनार असलेल्या संतूच्या घरी घडली. संतूर यांच्या चांदीच्या कामात वापरले जाणारे अॅसिड त्यांनी घरात साठवून ठेवले होते. रविवारी, घरातील एका महिलेने कुटुंबासाठी जेवण बनवताना चुकून पाण्याऐवजी हे अॅसिड वापरले. हे अॅसिड पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कंटेनरमध्येच भरून ठेवण्याच आले होते. त्यामुळे जेवण बनवताना त्या महिलेची गल्लत झाली आणि तिने पाण्याऐवजी जेवणात अॅसिडचा वापर केला.
जेवण तयार झाल्यानंतर काही वेळातच घरच्यांनी जेवण केले. मात्र जेवणाच्या काही वेळातच घरच्यांची तब्येत बिघडली. पोटात तीव्र वेदना, उलट्या, श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांनी तातडीने घाटाल रुग्णालयात धाव घेतली. या सहा जणांपैकी एका मुलाची तब्येत गंभीर असल्याची माहिती आहे. आम्लयुक्त अन्न सेवन केल्यामुळे हे घडले असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
डॉक्टरांनी सुरुवातीला त्यांच्यावर घाटाल रुग्णालयात उपचार केले, परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी कोलकाता येथे हलवण्यात आले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच प्रत्येकाने सावधानगिरी बाळगण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. विशेषत: ज्यांच्या घरात लहान मुले आहेत त्यांनी घरात असे पदार्थ ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

























































