धक्कादायक! स्कूटर देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने पत्नीसह सासू-सासऱ्यांना पेटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका किरकोळ वादातून धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीने स्कूटर देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या नवऱ्याने पत्नी आणि तिच्या वृद्ध पालकांवर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या भीषण हल्ल्यात तिघेही गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंगा (32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला सुमलता (27) ही घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. ही खळबळजनक घटना बंगळुरूच्या ताराबानहल्ली भागातील सुमलताच्या घरी घडली. रविवारी आरोपी पांडुरंगा हा सुमलताच्या घरी आला होता आणि त्याने तिच्याकडे तिची स्कूटर मागितली. मात्र, सुमलताने गाडी देण्यास स्पष्ट नकार दिला, ज्यावरून दोघांमध्ये  वाद झाला. दोघांमधील वाद विकोपाला गेलेला पाहून सुमलताच्या पालकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे पांडुरंगाचा राग अनावर झाला. त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल काढले आणि पत्नीसह तिच्या आई-वडिलांवर ओतून त्यांना आग लावली. क्षणार्धात तिघेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि घरात आरडाओरड सुरू झाली. किंचाळ्या ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले आणि त्यांनी आग विझवून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी धमकी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत पांडुरंगाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.