सोशल मीडियावरील पोस्टवरून बंगळूरू पेटले, गोळीबारात तीन ठार; 100 पोलीस जखमी

सबुकवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे कर्नाटकाची राजधानी बंगळुरूमध्ये आगडोंब उसळला. जमावाने प्रचंड जाळपोळ केली. काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर हल्ला करीत पोलीस स्टेशनची तोडफोड करीत आग लावली. शेकडो वाहने जळून खाक झाली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तीन जण ठार झाले. दगडफेकीत 100वर पोलीस जखमी झाले असून 110 जणांना अटक केली आहे. बंगळुरू शहरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी आमदार मूर्ती यांच्या एका नातेवाईकाला अटक केली आहे.

काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याने धार्मिक भावना दुखवणारे आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे. त्याला अटक केल्याची माहिती बंगळुरूचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली. मंगळवारी रात्री डी.जे. हल्ली परिसरात तणाव निर्माण झाला. शेकडो लोकांच्या जमावाने पुलकेशनगर येथील आमदार मूर्ती यांच्या घरावर हल्ला केला. दरम्यान, आमदार मूर्ती आणि त्यांचे कुटुंबीय सुदैवाने घरात नव्हते. आमदार मूर्ती यांना मारण्यासाठी जमावाने हल्ला केला होता, अशी माहिती तपासात पुढे येत आहे, असे कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी सांगितले. हिंसाचार पूर्वनियोजित होता. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.

हिंसाचार कसा घडला?
– आमदार मूर्ती यांच्या घरावर हल्ला केल्यानंतर जमावाने मूर्ती यांची वाहने पेटविली आणि आगडोंबाला सुरुवात झाली.
-आमदार मूर्ती यांच्या घरापासून रस्त्यावरील अनेक वाहनांना आगी लावल्या. शेकडोंच्या जमावाने डी.जे. हल्ली पोलीस स्टेशनवर तुफान दगडफेक केली. पोलीस स्टेशनच्या इमारतीचा एक भाग जाळला.
– जमावाने पोलिसांची अकरा वाहने जाळली.
– जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला सुरूच ठेवला. पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तीन जण ठार झाले आहेत.
– शंभर पोलीस जखमी झाले असून 110 दंगेखोरांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या