
प्रोफेसरच्या लैंगिक छळाला कंटाळून ओडिसात महाविद्यालयीन विद्यार्थिनी स्वतःला पेटवून घेतल्याची घटना ताजी असताना बंगळुरूत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रोफेसर आणि दोन मित्रांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये दोन प्रोफेसर आणि त्यांच्या एका मित्राचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयातील फिजिक्सचा प्रोफेसर नरेंद्र याने शैक्षणिक नोट्स शेअर करण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीशी संपर्क साधला आणि हळूहळू सतत मेसेजिंगद्वारे मैत्री निर्माण केली. त्यानंतर नरेंद्रने विद्यार्थिनीला आपला बेंगळुरू येथील मित्र अनुपच्या घरी बोलावले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. घडलेल्या घटनेबद्दल कुणालाही सांगितल्यास तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.
काही दिवसांनंतर, बायोलॉजीचा प्रोफेसर संदीपने विद्यार्थिनीकडे शरीरसंबंधाची मागणी केली. विद्यार्थिनीने प्रतिकार करताच तिला ब्लॅकमेल केले. त्याच्याकडे नरेंद्रसोबतचे तिचे फोटो आणि व्हिडिओ असल्याचा दावा करत त्याने अनुपच्या घरी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अनुपने विद्यार्थिनीला त्याच्या खोलीत प्रवेश करतानाचे सीसीटीव्ही फुटेज दाखवून धमकी दिली आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला.
अखेर पीडित विद्यार्थिनीने याबाबत पालकांना सांगितले. पालकांनी तात्काळ कर्नाटक राज्य महिला आयोगाकडे संपर्क साधला आणि नंतर मराठाहल्ली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दोन्ही शिक्षक आणि अनूप यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.