महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्टची जय्यत तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 व 6 डिसेंबर रोजी बेस्टतर्फे विविध प्रकारच्या सेवासुविधा देण्यात येणार आहेत. बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी याबाबतची माहिती दिली.

विद्युत विभागातर्फे
-चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, राजगृह, आंबेडकर कॉलेज या ठिकाणी 301 अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसवण्यात येणार आहेत.
– दादर चौपाटी, महापौर निवास व ज्ञानेश्वर उद्यान येथे 3 सर्च लाइटस्.
-पालिकेने परवानगी दिलेल्या संस्थांच्या मंडप व तंबूंना तात्पुरता वीजपुरवठा.

जादा बसगाडय़ा
-दादर स्थानक ते शिवाजी पार्कदरम्यान 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत संपूर्ण दिवस 24 तास अतिरिक्त बसफेऱया कार्यान्वित.
– बोरिवली ते कान्हेरी गुंफा, मालाड ते मार्वे, बोरिवली ते गोराई खाडी अतिरिक्त बससेवा चालवण्यात येणार आहे.
– 5 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजल्यापासून वडाळा आगार ते मालवणी आगार, मुंबई सेंट्रल आगार ते टाटा वीज केंद्र, रा. ग. गडकरी चौक ते कन्नमवार नगरपर्यंत संपूर्ण रात्र बसगाडय़ा चालवण्यात येणार आहेत.

मुंबई सेवा दर्शन
चैत्यभूमीला भेट द्यायला आलेल्या अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील स्मृतिस्थळांना, वास्तूंना भेट देण्याची इच्छा असते. त्याकरिता विशेष बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. यामध्ये राजगृह, आंबेडकर महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालय, आंबेडकरी स्मारक, मंत्रालय, विधानभवन, गिरगाव चौपाटी, हाजीअली, दूरदर्शन, सिद्धिविनायक मंदिर, प्लाझा या बससेवेसाठी 150 रुपये बसभाडे आकारण्यात येणार आहे. शिवाजी पार्क येथून या गाडय़ा चालवण्यात येणार आहेत अशी माहिती अध्यक्ष चेंबूरकर यांनी दिली.

– प्रवासी माहिती केंद्र, दैनंदिन बसपास, मॅजिक बसपास यांची सोय.
– आपत्कालीन परिस्थितीत 10 बसगाडय़ा तैनात.
– अल्पोपाहार.
– प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक अधिकारी व बस निरीक्षक यांची नियुक्ती.
– प्रथमोपचार व वैद्यकीय सेवा सुविधा.
– तंबाखू बंद करण्याची इच्छा असलेल्या पहिल्या 500 जणांना भेट.

रेल्वेने अनुयायांसाठी लांब पल्ल्याच्या जादा गाडय़ा सोडाव्यात!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशाच्या कानाकोपऱयातून लाखो अनुयायी रेल्वेने मुंबईत येतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाडय़ांना जादा डबे जोडावेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर टर्मिनस येथून महापरिनिर्वाण दिन विशेष गाडय़ा सोडाव्यात, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने केली आहे. विरार ते चर्चगेट आणि कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान जादा लोकल चालवाव्यात. प्रमुख रेल्वे स्थानकांवर जादा तिकीट खिडक्या सुरू कराव्यात, दादर रेल्वे स्थानकाच्या पुलांवर दिशादर्शक फलक लावावेत, पुलांवर फेरीवाले बसणार नाहीत याची दक्षता घ्यावी. रेल्वेच्या केंद्रीय सूचना प्रसारण केंद्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ही उद्घोषणा सातत्याने करावी, अभिवादनाचे फलक ठिकठिकाणी लावावेत, असे आवाहन समन्वय समितीचे प्रतिनिधी नागसेन कांबळे यांनी केले आहे.

मध्य रेल्वेच्या विशेष लोकल
6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी दादर चैत्यभूमी येथे देशभरातून येणाऱया अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने 5 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार असून दादर ते कल्याण-ठाणे-कुर्ला आणि कुर्ला ते मानखुर्द-पनवेल-वाशी या विभागात चालविण्यात येणार आहेत.

मेन लाइन – डाऊन स्पेशल
दादर-ठाणे स्पेशल दादरहून रात्री 1.15 वाजता सुटून ठाणे येथे रात्री 1.55 वाजता पोहोचेल. दादर-कल्याण स्पेशल लोकल दादरमधून मध्यरात्री 2.25 वाजता सुटून कल्याणला 3.35 वाजता पोहोचेल. दादर-कुर्ला स्पेशल दादर येथून मध्यरात्री 3 वाजता सुटून कुर्ला येथे मध्यरात्री 3.15 वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन – डाऊन स्पेशल
कुर्ला-मानखुर्द डाऊन स्पेशल कुर्ला येथून मध्यरात्री 2.30 वाजता पोहोचेल. कुर्ला-पनवेल डाऊन स्पेशल कुर्ला येथून मध्यरात्री 3 वाजता सुटून पनवेलला पहाटे 4 वाजता पोहोचेल. तर कुर्ला-वाशी स्पेशल कुर्ला येथून पहाटे 4 वाजता सुटून वाशी येथे पहाटे 4.35 वाजता पोहोचेल.

मेन लाइन – अप स्पेशल
कुर्ला-दादर अप स्पेशल कुर्ला येथून रात्री 12.45 वाजता सुटून दादर येथे रात्री 1 वाजता पोहोचेल. तर कल्याण-दादर अप स्पेशल कल्याण येथून रात्री 1 वाजता सुटून दादरला रात्री उशिरा 2.10 वाजता पोहोचेल. ठाणे-दादर अप स्पेशल ठाण्याहून मध्यरात्री 2.10 वाजता सुटून दादरला मध्यरात्री 2.50 वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन – अप स्पेशल
वाशी-कुर्ला अप स्पेशल वाशी येथून रात्री 1.30 वाजता सुटून कुर्ला येथे रात्री 2.20 वाजता पोहोचेल. तर पनवेल-कुर्ला स्पेशल पनवेलहून रात्री 1.40 वाजता सुटून कुर्ला येथे रात्री 2.45 वाजता पोहोचेल. मानखुर्द-कुर्ला स्पेशल मानखुर्द येथून रात्री 3.10 वाजता सुटून कुर्ला येथे रात्री 3.30 वाजता पोहोचेल.