बेस्ट बेकरी खटल्याचा निकाल 29 मार्चला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोध्रा  जळीतकांडानंतर गुजरातमधील बेस्ट बेकरीच्या आवारात घडलेल्या 14 जणांच्या हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल पुन्हा लांबणीवर पडला आहे. हत्याकांडातील सहभागाच्या आरोपाखाली मागील 10 वर्षे तुरुंगात असलेल्या दोन आरोपींच्या दोषत्वाचा निर्णय मुंबई सत्र न्यायालय देणार आहे.

हा निकाल बुधवारी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र अजून निकालपत्र पूर्ण न झाल्यामुळे सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी निकालाची सुनावणी 29 मार्चपर्यंत तहकूब केली. 1 मार्च 2002 रोजी वडोदरा येथील हनुमान टेकडीवरील बेस्ट बेकरीवर संतप्त जमावाने हल्ला केला होता. गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेस जाळल्यानंतर ही घटना घडली होती. जमावामध्ये हर्षद सोलंकी व मफत गोहिल या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. हे दोघे सध्या आर्थर रोड तुरुंगात कैद असून बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले होते. याप्रकरणी 29 मार्चला पुढील सुनावणी होणार असून या निकालाकडे गुजरातसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.