सामना ऑनलाईन, मुंबई
सलग तिसऱ्या वर्षी बेस्ट प्रशासनाने मांडलेला सन 2019-20 चा तुटीचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीने मंजूर करून सभागृहाकडे पाठवला. एक लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा असताना बेस्टने पाठवलेल्या 769.68 कोटी तुटीच्या अर्थसंकल्पाचे भवितव्य आता सभागृहाच्या आणि पालिका प्रशासनाच्या हातात आहे.
आर्थिक तोटय़ात असलेल्या बेस्ट उपक्रमाचा सन 2019 – 20 चा अर्थसंकल्प आज स्थायी समितीत कोणतीही चर्चा न करता एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्या भाषणात बेस्टला आपले उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक सूचना केल्या. बेस्टचा 6124.82 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करत असताना बेस्ट कर्मचाऱ्यांना त्वरित सानुग्रह अनुदान द्यावे असे आदेश यशवंत जाधव यांनी दिले. तसेच बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या ठरावाच्या लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
बेस्टला अनुदान मिळणार का
बेस्टला 1 एप्रिलपासून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करावी लागते. त्यामुळे तत्पूर्वी सभागृहात हा अर्थसंकल्प मंजूर होणे आवश्यक आहे. मात्र त्याआधी पालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार असून त्यात बेस्टसाठी आर्थिक तरतूद केली जाणार का यावर या अर्थसंकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.
स्थायी समिती अध्यक्षांनी केल्या सूचना
- अर्थसंकल्पावरील भाषणात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी विद्युत पुरवठा विभाग तसेच परिवहन विभागासाठी अनेक उपयुक्त सूचना केल्या.
- दक्षिण मुंबईत होत असलेल्या उत्तुंग इमारतींसाठी विद्युत पुरवठा करण्यासाठी वीजग्राहक वाढवण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
- वीजचोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्याला अटकाव घालण्यासाठी योग्य ते पाऊल उचलावे.
- जुन्या वीजमापकांमुळे उपक्रमाच्या उत्पन्नामध्ये घट होत असल्याने नवीन प्रणालीची वीजमापके लावावी.
- मोनो व मेट्रो यांना विद्युत पुरवठा करण्याबाबत बेस्टने पालिका प्रशासन व राज्य सरकारबरोबर चर्चा करावी.
- पालिकेने बेस्टला विविध करांमधून सूट देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
- खासगी कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बसगाडय़ा उपलब्ध करून दिल्यास त्यामुळे महसूल वाढण्यास मदत होईल.
- बेस्ट उपक्रमाने वीजनिर्मिती क्षेत्रामध्ये पाय रोवण्याकरिता स्वतंत्र ध्येय निश्चित करावे. वीजनिर्मिती करण्याकरिता पालिकेने भूखंड उपलब्ध करून द्यावा.



























































