बेस्ट बसमध्ये हातसफाई करणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गर्दीचा फायदा घेऊन बेस्टच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे पाकीट मारणाऱ्याला युनिट- 8 ने अटक केली. राजा ऊर्फ राजाराम पाटील असे त्याचे नाव आहे. तो गेल्या काही वर्षांपासून बेस्टच्या जुन्या बसेसमध्ये चोऱ्या करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

अंधेरी परिसरात बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे पाकीट आणि मंगळसूत्र चोरी होत असल्याच्या घटना घडत होत्या. बेस्टमध्ये हातसफाई करणारा एक जण अंधेरी परिसरात येणार असल्याची माहिती युनिट-8चे पोलीस शिपाई शरद बिडवे यांना मिळाली. त्या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांच्या पथकातील शिरसाट, यादव, किणी, सावंत आणि तावडे यांच्या पथकाने शनिवारी अंधेरी परिसरात सापळा रचला. सापळा रचून पोलिसांनी राजाला अटक केली. राजा हा सराईत गुन्हेगार असून तो गर्दीच्या वेळीच चोऱ्या करतो. त्याच्याविरोधात भायखळा, डी. एन. नगर, गावदेवी, वरळी, मालाड, मुंब्रा येथे गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या गुह्यात यापूर्वी पोलिसांनी राजाच्या तीन साथीदारांना गजाआड केले होते.