
बेस्टच्या रखडलेल्या वेतन करारावरून ऐन गणेशोत्सवात बेस्ट संपाची धमकी देणाऱ्या बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी वडाळा आगारात मंगळवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषणाचे आंदोलन गौरी-गणपतीचा सण संपेपर्यंत स्थगित केले आहे.
बेस्टचा 2016 पासून रखडलेला वेतन करार, अर्थसंकल्पाचे विलीनीकरण, दिवाळी बोनस आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कृती समितीने धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारीच सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर बेस्ट कामगारांना पगार करण्याच्या बेस्ट कामगार सेनेच्या मागणीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने बेस्ट प्रशासनाने तत्त्वतः मंजुरी दिली असल्याने गणपती बाप्पा पावल्याचे समाधान बेस्ट कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर असताना राव यांनी बेमुदत उपोषण हट्ट कायम ठेवत पुन्हा वडाळा आगार गाठले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात संपाची टांगती तलवार मुंबईकरांवर होती.
आज गुरुवारी तब्येत खालावल्याने शशांक राव यांना केईएममध्ये सायंकाळी 4 वाजता नेण्यात आले. त्यानंतर त्यांनी गौरी-गणपतीचा सण संपेपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचे जाहीर केल्याने मुंबईकरांवर ऐन सणाच्या तोंडावरील संकट तूर्त टळले आहे.

























































