
सामना ऑनलाईन । मुंबई
बेस्टची सीएनजीवर धावणारी बस अचानक गॅस गळती होऊन पेटल्याची घटना शुक्रवारी सकाळी गोरेगावच्या गोकुळधाम मार्केटजवळ घडली. सकाळी 7.20 वाजता घडलेल्या या घटनेत बसमध्ये तीनच प्रवासी असल्याने ते थोडक्यात बचावले. या आगीमध्ये बस संपूर्ण जळून खाक झाल्याने बसचा केवळ सांगाडा उरला.
दिंडोशी डेपोची मार्ग क्रमांक 646ची बस गोरेगाव स्थानकाकडून दिंडोशीकडे निघाली होती. ही बस गोकुळधाम मार्केट येथे नागरी निवारा प्रकल्प 1 व 2 जवळ आली असता सकाळी 7.20 वाजण्याच्या सुमारास बसमधून मोठा आवाज आल्याने सीएनजी गॅसची गळती झाल्याचे चालक आणि वाहकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर प्रसंगावधान दाखवत चालक आणि वाहकांनी बसमधून प्रवास करणाऱ्या तिघा प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले आणि आगीचा लोळ उडत बस संपूर्णपणे खाक झाली. मुंबई अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन बसला लागलेली आग विझवली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.


























































