
पर्यावरण संवर्धनासाठी ‘इलेक्ट्रिक बस’ धोरण राबवणाऱया ‘बेस्ट’ प्रशासनाने आता वीज ग्राहकांना पर्यावरणपूरक पवन ऊर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘बेस्ट’ प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत. यामध्ये प्रतिसाद देणारी पात्र कंपनी किती मेगावॅट विजेचा पुरवठा करते, या क्षमतेवर निवड केली जाणार असल्याची माहिती ‘बेस्ट’ प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईत ‘बेस्ट’ उपक्रमाचे एकूण 10 लाख 47 हजार 540 वीज ग्राहक आहेत. ‘बेस्ट’ उपक्रमाच्या माध्यमातून दररोज 780 मेगावॉट वीज पुरवठा करण्यात येतो. या वीज ग्राहकांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे वाढती मागणी आणि पर्यावरण संवर्धनासाठी पवन ऊर्जा घेतली जाणार आहे. पवन ऊर्जा ही अक्षय्य ऊर्जा आहे आणि ती सहजासहजी उपलब्ध करून घेता येते. ही ऊर्जा अत्यंत सुरक्षित आणि किफायतशीर आहे. पवन ऊर्जेमुळे विजेची बचत होते आणि पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य होते. पवन ऊर्जा फायदेशीर ठरणार असल्याचे ‘बेस्ट’ प्रशासनाचे म्हणणे आहे. सुरुवातीला एकवर्षासाठी पवन ऊर्जा पुरवठय़ाचे कंत्राट दिले जाणार आहे.