‘बेस्ट’ निर्णय! वाढीव वीज बिलाचा परतावा व्याजासह खात्यावर जमा होणार

बेस्ट’च्या वीज ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळातील पाठवण्यात आलेली तीन महिन्यांची बिले ही मार्च महिन्यातील बिलावर आधारित पाठवण्यात आली आहेत. मात्र यामध्ये आलेल्या वाढीव बिलांचा परतावा व्याजासह वीज ग्राहकांच्या खात्यावर जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ‘बेस्ट’ प्रशासनाने घेतला आहे. वीज ग्राहकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या या ‘कृतज्ञता पॅकेज’मध्ये ग्राहकांना हे बिल तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभाही असेल.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, आशीष चेंबूरकर, अनिल कोकीळ, महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे उपस्थित होते. यावेळी ‘बेस्ट’च्या इतर प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली.

औद्योगिक, व्यावसायिक ग्राहकांना 10 टक्के बिल
लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योग-व्यवसाय पूर्णपणे बंद होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या अंदाजित वापराच्या 10 टक्के बिल काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय या वीज बिल ग्राहकांना आपले बिल पुढील तीन महिन्यांत भरण्याची मुभा असले.

…तर बिल वाढूही शकते
लॉकडाऊनच्या काळात कामावर जाणारे सर्वजण घरी थांबल्यामुळे या काळात विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे आता मार्चच्या वापरावर बिल देण्यात येणार असले तरी प्रत्यक्ष रीडिंग घेतल्यानंतर काही जणांचे बिल वाढूही शकते, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर लॉकडाऊन काळात काही जण गावी गेल्यामुळे घर, दुकान बंद असल्याने बिल कमीही होऊ शकेत, असेही स्पष्ट करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या