बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा, 18 जूनचा अल्टिमेटम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमातील आजी-माजी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नावर 12 कामगार संघटनांच्या संयुक्त कामगार कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. कामगारांच्या सर्व मागण्यांबाबत 18 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा बेमुदत संपावर जाऊ, असा निर्वाणीचा इशारा देत कृती समितीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी पत्र लिहिले. कामगारांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर सरकार कोणती भूमिका घेतेय, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

बेस्ट उपक्रमाच्या परिवहन आणि विद्युत विभागातील कामगारांचे प्रश्न तसेच विविध मागण्यांची दखल महायुती सरकारकडून घेण्यात आलेली नाही. वारंवार दाद मागूनही महायुती सरकार ढिम्म असल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारला जाग आणण्यासाठी बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या तब्बल 12 संघटना एकवटल्या असून त्यांच्या कृती समितीचा मेळावा सोमवारी दादरमध्ये पार पडला. या मेळाव्यात मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी तीव्र संघर्ष करण्याशिवाय पर्याय नसल्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.