
रात्री कामावरून उशिरा येणारे आणि रात्रपाळीला जाणाऱयांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सुरक्षित प्रवासासाठी फायदेशीर ठरणारी रात्री 12 ते सकाळी 4 पर्यंतची ‘बेस्ट’ बस सेवा आता बंद करण्यात येणार आहे. प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ‘बेस्ट’ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
धकाधकीच्या आणि गजबजलेल्या शहरात मुंबईकरांची पहिली लाईफलाईन रेल्वेनंतर ‘बेस्ट’मध्ये सर्वाधिक गर्दी असते. एकेकाळी तीन शिफ्टमध्ये चालणाऱया मिल कामगारांसाठी बेस्टची रात्र सेवा खूपच उपयुक्त ठरत होती. शिवाय कामावरून उशिरा घरी जाणारे, पर्यटक यांच्यासाठीदेखील बेस्टची रात्र सेवा उपयोगी पडायची. उशिरा रात्री टॅक्सी, रिक्षाचालकांकडून भरमसाट भाडे आकारले जात असताना अत्यंत परवडणाऱया पैशात मुंबईकरांना सुरक्षित प्रवास करता येत होता. मात्र आता रात्रीची ‘बेस्ट’ सेवा बंद झाल्याने रात्रीचा प्रवास करणाऱयांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे.
गेल्या काही काळात बसेसची घटलेली संख्या आणि रात्र पाळीच्या बसेसमध्ये घटलेल्या प्रवाशी संख्येच्या पार्श्वभूमीवर रात्रीची बस सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– लोकेश चंद्र, ‘बेस्ट’ महाव्यवस्थापक
रात्र बस सेवा 1 मर्यादित माहीम ते कुलाबा आगार दरम्यान, 202 मर्यादित माहीम ते बोरिवली बस स्थानक, सी 440 माहीम ते बोरिवली स्थानक पूर्व दरम्यान, बस क्रमांक 66 मर्यादित धारावी आगार ते कुलाबा आगार व बस क्रमांक सी 305 जलद धारावी आगार ते बॅकबे आगार दरम्यान रात्री 12 ते सकाळी 4पर्यंत दर तासाने धावत होत्या.
‘बेस्ट’च्या रात्र सेवेतील बस कंत्राटदार ‘मातेश्वरी’ कंपनीकडून चालवल्या जातात. या कंपनीच्या बसची संख्या गेल्या काही दिवसांपासून घटली आहे. याच सद्यस्थितीत ऑनलाईन टॅव्हलिंग सेवांमुळे रात्रीच्या प्रवाशी संख्येवर परिणाम झाला आहे.































































