बेस्टकडे स्वतःच्या फक्त 249 बस शिल्लक, दोन महिन्यांत 59 गाडय़ा भंगारात काढल्या

>>  मंगेश मोरे 

‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ मानल्या जाणाऱया बेस्ट उपक्रमाच्या अस्तित्वाबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. एकीकडे मुंबईकरांकडून ‘बेस्ट’ वाचवण्याची मागणी होत आहे. मात्र सरकारदरबारी बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या बसेस समाविष्ट करण्याबाबत उदासीनता आहे. गेल्या दोन महिन्यांत 59 गाडय़ा भंगारात गेल्यामुळे बेस्टच्या ताफ्यात आता केवळ 9 टक्के म्हणजे 249 स्वमालकीच्या गाडय़ा उरल्या आहेत. याउलट महायुती सरकारने खासगी कंपन्यांवर दाखवलेल्या ‘कृपे’मुळे वेटलिजच्या बसेसची संख्या थेट 2489 वर पोहोचली आहे.

बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाने कित्येक वर्षे मुंबईकरांना परवडणाऱया तिकीट दरात बससेवा दिली. त्यामुळे बेस्ट आणि मुंबईचे नाते अधिक घट्ट बनले. मात्र मागील काही वर्षांत बेस्टच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि बेस्टची आर्थिक ‘गाडी’ कोलमडली आहे. त्यातच उपक्रमाच्या स्वमालकीच्या गाडय़ांना उतरती कळा लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या 308 बसेस शिल्लक होत्या. ती संख्या दोन महिन्यांत 59 ने कमी होऊन 249 पर्यंत खाली आली आहे. सद्यस्थितीत बेस्टच्या संपूर्ण सेवेत खासगी कंपन्यांच्या 2489 आणि स्वमालकीच्या 249 बसेस अशा 2738 बसेस आहेत. एकूण गाडय़ांच्या तुलनेत स्वमालकीच्या बसेसचे प्रमाण केवळ 9 टक्के आहे, तर वेटलिजच्या बसेसचे प्रमाण तब्बल 90.91 टक्के आहे. यात बेस्टच्या स्वमालकीच्या डिझेलवर चालणाऱया बसेस 243 आणि इलेक्ट्रिक बसेस अवघ्या 6 आहेत. तथापि, खासगी कंपन्यांच्या सीएनजीवर चालणाऱया 1225 आणि इलेक्ट्रिक 1264 बसेस मुंबई शहर आणि उपनगरांतील रस्त्यांवर धावत आहेत. स्वमालकीच्या बससंख्येत सातत्याने होणारी घट बेस्टच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे. सरकार खासगी कंपन्यांच्या गाडय़ांच्या खरेदीला प्राधान्य देत आहे. मात्र बेस्टचा स्वमालकीचा बसताफा भक्कम करण्याकामी निक्रिय असल्याने मुंबईकरांकडून संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. विविध संघटनादेखील बेस्ट वाचवण्यासाठी पुढाकार घेऊ लागल्या आहेत.

स्वस्तातील प्रवास बंद होण्याची भीती

सरकारने तातडीने बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या बसेस समाविष्ट केल्या नाहीत तर बेस्टचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे मुंबईकरांना स्वस्त दरातील उपलब्ध होणाऱया प्रवासाची सुविधा बंद होईल. बसफेऱयांच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल, अशी शक्यता वाहतूकतज्ञांकडून वर्तवली जात आहे.

खासगी कंपन्यांच्या मिनी, सिंगल डेकर आणि डबल डेकर अशा एकूण 1869 एसी बसेस आहेत, तर 800 गाडय़ा नॉन एसी आहेत. यामध्ये 1264 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.

बेस्टचा बसताफा

स्वमालकीच्या 249
वेटलिज बसेस 2489
एकूण बसेस 2738