
डीजीटल तिकीट पद्धतीस चालना देण्यासाठी बेस्टने बेस्ट ‘चलो अॅप’ आणि स्मार्टकार्ड बसपास, एनसीएमसी कार्ड योजनांचा शुभारंभ केला आहे. आता बेस्टने दिव्यांग व्यक्तींसाठी जुने सवलतीचे ओळखपत्र (कागदी) बदलून नवे स्मार्टकार्ड देण्याचे ठरविले आहे.
बेस्टच्या सर्व विशेष श्रेणीतील सवलतींसाठी प्रवाशांनी ‘बेस्ट चलो अॅप’ डाऊनलोड करून बसपासच्या मान्यतेकरिता ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाहीत, परंतु त्यांना स्मार्टकार्ड हवे आहे. त्यांच्यासाठी बेस्टने घरपोच कार्ड पोहोचविण्याची विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी कॉल सेंटरकडून विशेष सवलतीच्या पासधारकांना कॉल केला जाईल व जे स्मार्ट कार्ड घेण्यास इच्छुक आहेत त्यांना त्यांच्या पत्त्यावर कुरिअरद्वारे कार्ड पोहचविले जाईल. बेस्टचे कॉल सेंटर 24 x 7 कार्यान्वित रहाणार असून त्याचा क्रमांक 1800 227550 (टोल फि) आणि 022 24190117 असा आहे.
सर्व विशेष श्रेणीतील प्रवाशांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्वरित बेस्ट चलो अॅपद्वारे त्यांचे जुने कार्ड बदली करून घ्यावे किंवा नवीन स्मार्ट कार्ड घ्यावे. 15 सप्टेंबर 2022 पासून जुने बसपास अवैध मानले जातील, याची कृपया नोंद घ्यावी असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.

























































