भादा ग्रामपंचायततर्फे लाभार्थ्यांना रेशन धान्य घरपोच पुरवठा

औसा तालुक्यातील भादा येथील ग्रामपंचायत कार्यालयातर्फे शासनाकडून दर महिन्याला रेशन दुकानातून लाभार्थ्यांना मिळणारे धान्य यावेळी वाटप करण्यासाठी भादा ग्रामपंचायने कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून एक वेगळा उपक्रम राबवला. गावातील प्रत्येक लाभार्थ्यांना हे धान्य घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे. सदरील धान्य घरपोच देण्यासाठी वाहन व्यवस्था व मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन ग्रामपंचायतीने सामाजिक जबाबदारी जोपासली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यातील कुठलाही व्यक्ती उपाशी राहू नये, म्हणून विविध योजना आखल्या असून प्रत्येक व्यक्तीला धान्य मिळावे हा हेतू शासनाचा आहे. त्याच धर्तीवर भादा येथील ग्रामपंचायतीने घरपोच धान्य देण्याचा हा एक चांगला उपक्रम राबवला आहे.

भादा हे गाव लोकसंख्येच्या तुलनेत या परिसरातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाणारे आहे. त्यामुळे बहुधा हे गर्दीचे ठिकाण असल्याने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानात गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक कुटुंबाला घरपोच धान्य देण्याचे व पुरवण्याचे कार्य सुरू आहे त्यामुळे दुकानात गर्दी होणार नाही व लाभार्थ्यांना घरपोच सेवा मिळेल या स्तुतितुल्य उपक्रमाची या परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या