गीताबोध – माणूस म्हणून जगताना…

>> गुरुनाथ तेंडुलकर

आज मी कोणत्याही एका श्लोकावर भाष्य न करता थोडं माणूस या प्राण्याबद्दल बोलणार आहे. मनुष्यप्राण्याचा इतिहास पाहिला तर आपल्या ध्यानात येईल की, हजारो लाखो वर्षांपूर्वी गुहेत राहणारा आदिमानव प्रगत होत होत आज इथवर पोहोचला ते केवळ आणि केवळ बुद्धीच्या जोरावरच.

एक संस्कृत श्लोक सांगतो.

आहार निद्रा भय मैथुनं च ।

सामान्यम् एतद् पशुभि नराणाम् ।

बुद्धैर्हि तेषाम् अधिको विशेषो ।

बुद्धिर्विहिना पशुभि समानाः ।।

(भावार्थ ः माणूस आणि पशू यांच्यातील साम्य आणि भेद सांगताना सुभाषितकार म्हणतात, आहार म्हणजेच खाणंपिणं, निद्रा म्हणजे झोपणं, भय म्हणजे भीती आणि मैथुन म्हणजे नर-मादीने पुनरुत्पादनासाठी केलेली संभोग क्रिया हे चार घटक माणूस आणि इतर प्राणी यांच्यात सारखेच आहेत.)

पुढच्या ओळीत सुभाषितकार म्हणतात,

पण बुद्धी हा एकमेव घटक असा आहे जो इतर पशूंमध्ये नाही. केवळ आणि केवळ माणसामध्ये आहे. म्हणूनच ज्याला बुद्धी नाही असा माणूस हा पशूसमानच असतो.

या बुद्धीच्या जोरावर माणसाने काय काय केलं त्याचा विचार करू या. आदिमानव जेव्हा गुहेत राहत होता, ज्या वेळी चकमकीचे दगड एकमेकांवर घासून अग्नी निर्माण करण्याची कल्पनादेखील उदयाला आली नव्हती, ज्या वेळी मानव अगदी झाडांची पानंदेखील वस्त्रं म्हणून वापरत नव्हता, त्या कालखंडाचा थोडा विचार करू या.

त्या कालखंडात मानवाच्याच बरोबरीनं वाघ, सिंह, लांडगे यांच्यासारखे हिंस्र प्राणी अस्तित्वात होते. हत्ती होते, डुकरं होती, गायी-म्हशीदेखील होत्या. आकाशात उडू शकणारे अनेक प्रकारचे पक्षी होते. अनेक प्रकारचे कृमी, कीटक होते. पाण्यात राहणारे मासे होते, मगरी होत्या. अनेक अनेक प्रकारचे मानवेतर प्राणी अस्तित्वात होते. आजही आहेत.

पण आज आपण पाहिलं तर इतर सगळे प्राणी त्या वेळी ज्या स्थितीत होते, त्याच स्थितीत आजही आहेत. त्या वेळी गुहेत राहणारे वाघ, सिंह आजदेखील गुहेतच राहत आहेत आणि त्या कालखंडात झाडावर घरटं बांधून राहणारे पक्षी आजही घरटय़ातच राहत आहेत. मासे आणि इतर जलचर त्या वेळी पाण्यात राहत होते. आजही पाण्यातच राहत आहेत. प्रगती केली ती केवळ आणि केवळ मानवाने.

कारण…कारण मानव आणि इतर प्राणी यांमध्ये फरक आहे तो केवळ बुद्धीचाच. या बुद्धीच्याच जोरावर मानवाने गुहेपासून गगनचुंबी इमारतींपर्यंतचा पल्ला गाठला. माणसाला माशासारखं पोहता येत नसूनदेखील बोटी बांधून पाण्यावर स्वार झाला. समुद्रातून सहजतेनं सफर करू लागला. वाघ, सिंहाच्या वेगानं पळता येत नसूनदेखील वेगवान वाहनं निर्माण करून माणूस इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा अधिक वेगानं धावू लागला. पक्ष्यासारखं उडता येत नसूनदेखील विमानांचा शोध लावून आकाशात उडू लागला. नव्हे नव्हे, अवकाशात विहार करत मंगळापर्यंत पोहोचला.

एका बाजूला ही भौतिक प्रगती होत होती. त्याचबरोबर दुसऱया बाजूला समाजाची रचना होत होती. या समाजाला शिस्त लागावी म्हणून पुढे धर्म ही संकल्पना उदयास आली. बुद्धीचा विकास होत असतानाच त्या बुद्धीत काही अनावश्यक घटक शिरले. बुद्धी विकृत झाली. त्यातून स्वार्थाचा जन्म झाला. त्यातून पुढे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांसारखे मानवाच्या सर्वांगीण प्रगतीच्या मार्गातील शत्रू निर्माण झाले आणि त्यातून पुढे अनेक समस्या निर्माण झाल्या.

या समस्यांतून पुढे आणखी मोठी समस्या निर्माण झाली ती म्हणजे मानसिक ताणतणाव, चिंता, भीती, नैराश्य. इंग्रजीत ज्याला एन्झायटी अँड डिप्रेशन म्हणतात ते. असुरक्षिततेची भावना, अनेक प्रकारचे मानसिक आजार. या सगळ्यांतून मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शक ग्रंथ म्हणजे भगवद्गीता.

अर्जुनासारख्याला टप्प्याटप्प्याने, पायरीपायरीने समजावत भगवान श्रीकृष्णांनी योग्य मार्गावर आणले हा आपल्या देशाचा  गौरवशाली इतिहास आहे. म्हणूनच भगवद्गीता हा केवळ एक धर्मग्रंथ नाही, तर ते मानसशास्त्राचं प्राथमिक पाठय़पुस्तक आहे असं मी मानतो.

कोणत्याही प्रकारच्या मानसशास्त्राrय समस्यांची उकल भगवद्गीतेच्या अभ्यासातून करता येते. भगवान श्रीकृष्ण हे जगातील पहिलेवहिले आणि सर्वश्रेष्ठ मानसोपचार तज्ञ आहेत हे केवळ भारतीयच नव्हे, तर पाश्चात्त्य देशातील विद्वानदेखील मान्य करतात.

भगवद्गीता का अभ्यासायची? याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेतलं. गीतेबद्दल आयुष्यभर शंकाकुशंका काढत राहायच्या  की भगवद्गीतेच्या तलावात डुबकी मारून दिव्य माणूस व्हायचं हे प्रत्येकाने आपलं आपण ठरवायचं.

सध्या ‘गीताबोध’ या लेख मालिकेतून स्थितप्रज्ञाच्या लक्षणांवर आपण चर्चा करतो आहोत. दुसऱया अध्यायातील एकसष्ट श्लोक आपण समजून घेतले आहेत. ध्येयाकडे प्रवास करताना वाटेत उद्भवणाऱया समस्या आणि मन भरकटवणारी व्यसनं यांची कारणमीमांसा आपण थोडक्यात समजून घेतली आहे.

यापुढच्या दोन श्लोकांतून ‘माणूस म्हणून जीवन जगताना’ अधोगतीपासून स्वतला कसं सावरावं हे सांगण्यासाठी भगवान आपल्याला सर्वप्रथम अधोगतीच्या सगळ्या पायऱया टप्प्याटप्प्यानं सांगणार आहेत. त्या आपण पुढील लेखातून समजून घेऊया.

[email protected]