भय्यूजी महाराजांना कार्यक्रम पत्रिकेतून डावलण्याचा प्रकार उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने | बुलढाणा

आध्यात्मिक गुरू राष्ट्रसंत स्व. भय्यूजी महाराजांनी खामगावात सुरू केलेल्या सूर्योदय पारधी आश्रमशाळेसाठी बांधण्यात आलेल्या नूतन वास्तूच्या लोकार्पण १४ सप्टेंबर रोजी सरसंघचालक मोहन भागवत यांचे हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या पत्रिकेत भय्यूजी महाराजांनाच आयोजकांकडून डावलण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भय्यूजी महाराजांच्या भक्तांनी आक्षेप घेतल्यानंतर दुसर्‍या पत्रिकेत उल्लेख न करता केवळ एका कोपर्‍यात फोटो छापण्यात आला त्यामुळे भक्तांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.

आध्यात्मिक गुरू स्व. भय्यूजी महाराजांच्या प्रेरणेतून खामगाव तालुक्यातील सजनपुरी येथे पारधी समाजातील मुलांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आली आहे. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी नूतन वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. सोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना इतरही सुविधा पुरविण्यात येत आहेत.  सद्यस्थितीत इमारत फळास आली असून, या इमारतीचे १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता सरसंघचालकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल. यावेळी आश्रम शाळेतील पारधी समाजातील विद्यार्थ्यांशी सरसंघचालक मोहन भागवत हितगूज देखील साधणार आहेत. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, सरसंघचालकांच्या स्वागतासाठी रजतनगरी सज्ज होत आहे. लोकार्पणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सरसंघचालक खामगावातील एका स्वयंसेवकाच्या घरी सायंकाळचे जेवण सुद्धा घेतील. मात्र, सरसंघचालकांच्या या नियोजित कार्यक्रमाबद्दल अतिशय गोपनीयता पाळली जात आहे. या संदर्भात आज खामगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक पार पडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सजनपुरी येथील सूर्योदय पारधी आश्रमशाळेत पारधी समाजाचा हितगूज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात संघर्षातून पुढे गेलेल्या पारधी समाजातील प्रशासकीय अधिकार्‍यांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत सरसंघचालक पारधी आश्रम शाळेत विविध कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे.

पत्रिकेत भैय्युजी महाराजांचा उल्लेख नसल्यामुळे आक्षेप
खामगावातील पारधी शाळा भय्यूजी महाराज यांनी स्थापन केलेल्या सद्गुरु ट्रस्ट इंदूर मार्फत शासकीय मदतीने चालविण्यात येते. सदर शाळेची ७५० विद्यार्थी संख्या आहे. परंतु सदर शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करताना आयोजकांनी सुरुवातीला छापलेल्या पत्रिकेत भैय्युजी महाराजांचे नाव व फोटो छापला नव्हता. महाराज भक्तांनी आक्षेप घेतल्यानंतर फोटो पत्रिकेत छापला. परंतु खर्‍या अर्थाने पत्रिकेत संस्थापक प्रेरणास्त्रोत म्हणून भय्यूजी महाराजांचा उल्लेख असायला पाहिजे होता तो दुसर्‍याही छापलेल्या पत्रिकेत नसून केवळ फोटो छापण्यात आला आहे. भैय्युजी महाराजांना डावलण्याचा हा खटाटोप काही विघ्न संतोषी मंडळी करत असल्याचा आरोप भय्यूजी महाराजांच्या खामगाव येथील ऋषीसंकुलाचे अध्यक्ष एन.टी. देशमुख यांनी ‘सामना’शी बोलताना करुन भय्यूजी महाराजांना डावलण्याचा हा खटाटोप महाराजांचे भक्त कधीही सहन करणार नाही असेही निक्षुण सांगितले.

याबाबत सदर शाळेचे व्यवस्थापन पाहणारे विवेक कुळकर्णी यांच्याशी छापलेल्या दोन पत्रिकेबद्दल विचारणा केली असता त्यांनी एक पत्रिका संघाने व दुसरी पत्रिका आम्ही छापून त्यामध्ये भय्यूजी महाराजांचा फोटो टाकल्याचे सामनाशी बोलताना सांगितले. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बुलढाणा विभागीय कार्यवाह प्रल्हाद निमकर्डे यांना सदर पत्रिका छापली का याबाबत विचारणा केली असता संघाने कोणतीही पत्रिका छापली नसल्याचे सांगून संघ दुसर्‍या संस्थेने घेतलेल्या कार्यक्रमाच्या पत्रिका कधीही छापत नसल्याचे सामनाशी बोलताना स्पष्ट केले.