
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील भाल या गावात डंपिंग ग्राऊंडचे आरक्षण टाकले आहे, पण त्याला स्थानिकांचा विरोध आहे. विविध प्रकारच्या आरक्षणामुळे भाल गावात मोकळी जमीनच उपलब्ध राहत नसून डंपिंग ग्राऊंडप्रकरणी भालच्या ग्रामस्थांना दिलासा देणारा निर्णय घेऊ अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
ग्रामस्थांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात बैठक बोलावली होती. भाल या गावामध्ये केंद्र आणि राज्य सरकारची मिळून विविध प्रकारची आरक्षणे असून त्यामुळे 523 एकर जमिनीपैकी 499 एकर जमीन बाधित होत असल्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत. एकनाथ शिंदे म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प उभारणे आवश्यक असून अख्खे गाव बाधित होत असेल तर तो ग्रामस्थांवर अन्याय होईल. यासंदर्भात निश्चितपणे ग्रामस्थांना दिलासा देणारा निर्णय घेतला जाईल. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रमोद पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, जगन्नाथ शिंदे, सुभाष भोईर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त गोविंदराज, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश म्हात्रे आदी उपस्थित होते.


























































