
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वास उर्फ बापू बबन भागवत (35) यांची अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या केली. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रविवारी सकाळी 12 च्या सुमारास पंढरपूर-सातारा रस्त्यावर बापू बबन भागवत हे स्टेशनरी दुकानासमोर बसलेले असताना अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात जखमी झालेल्या बापू भागवत यांचा मृत्यू झाला. ही माहिती कळताच गावात शोककळा पसरून व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद केली सर्वत्र शुकशुकाट पसरला. सदर घटनेचे चित्रीकरण दुकानाच्या समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून पुढील तपास पोलीस विभागाकडून सुरू आहेत.
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, पंढरपूर- सातारा रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर असलेल्या श्री ब्रम्हचैतन्य स्टेशनरी दुकानासमोर बापू भागवत हे नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होते. यावेळी दोन अज्ञात हल्लोखोरांनी मोटरसायकलवर येऊन त्यांच्यावर गोळीबार केला. पहिली गोळी भागवत यांना लागली नाही, पण दुसर्या गोळीने त्यांचा घात केला. छातीमध्ये जबर गोळी लागल्याने मृत्यू झाला. जमिनीच्या वादातून पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी सागर कवडे, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर गोळीबारात मयत झालेले बापू भागवत यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.





























































