भंडारा नगर परिषदेत 25 ते 30 टक्के कमिशनशिवाय कामेच होत नाहीत, भाजप आमदाराचा घरचा आहेर

भंडारा जिह्यात नगर परिषदांमध्ये कामे मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दलाली आणि टक्केवारीची प्रथा सुरू होती. 25 ते 30 टक्के कमिशन दिल्याशिवाय कामेच होत नाहीत. यामध्ये सामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे, असे सांगत भाजप आमदार परिणय फुके यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे.

भंडारा जिह्यातील चारही नगर परिषदांमध्ये एकेकाळी भाजपची सत्ता होती. आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच भाजप आमदार परिणय फुके यांनी नगर परिषदेच्या कामात कोटय़वधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. कमिशनखोरीमुळे शहराच्या विकासाचा वेग थांबल्याचे सांगत नगर परिषदेत पुन्हा भाजपची सत्ता आली तर सर्व व्यवहारांची चौकशी करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

भाजपच्या अंतर्गत कलहामुळे भ्रष्टाचार उघड

राज्यात भाजपची सत्ता असूनही, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याची कबुली फुके यांनी दिल्याने नगर परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. भाजपमधील अंतर्गत कलहामुळे सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.