उमलण्याआधीच दहा कोवळे जीव धुरात कोमेजले!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यरात्री अंधारात भंडारा जिल्हा रुग्णालयात काळाने क्रूर घाला घातला. शॉर्टसर्कीटमुळे विशेष नवजात बालक केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) आग भडकली; धुराचे लोट पसरले आणि काही मिनिटांतच दहा कोवळे जीव उमलण्याआधीच कोमेजले. यातील 3 बालकांचा होरपळून, तर 7 जणांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. आपल्या काळजाचा तुकडा जग पाहण्यापूर्वीच कायमचा हिरावून गेल्याने मातांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. मातांच्या आक्रोशाने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. मन सुन्न करणाऱया या अग्निकांडाने महाराष्ट्रासह अवघा देश हळहळला असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधींसह अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. या घटनेची तातडीने गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय चौकशीसाठी सहा जणांची समिती नेमली आहे.

शनिवारची सकाळ उजाडली तीच भंडारा जिल्हा रुग्णालयातील हृदयद्रावक घटनेने. मन हेलावून टाकणाऱया या अग्निकांडचे दृष्य टी.व्हीवर पाहून अनेकांचे डोळे पाणावले. अतिदक्षता शिशू केअर युनिटमध्ये 10 दिवसांच्या नवजात शिशूंपासून तीन महिन्यांपर्यंतच्या बालकांवर उपचार सुरू होते. शुक्रवारी मध्यरात्री 1.30च्या सुमारास या नवजात केअर युनिटमध्ये शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. नर्सच्या लक्षात येताच तिने तत्काळ रुग्णालयाच्या अग्निशामन यंत्रणेला आणि इतर कर्मचाऱयांना माहिती दिली. क्षणात आगीने रौद्र रूप घेतले आणि भडका उडाला. धुराचे लोट पसरले. अग्निशामन कर्मचारी आणि इतर स्टाफने सात बालकांचा जीव वाचवला. मात्र, धुरामुळे सात बालके गुदमरली आणि तिघांचा होरपळून मृत्यू झाला. ज्या कोवळ्या जीवांनी जगही पाहिले नाही, ज्यांचे बोबडे बोलही पालकांनी ऐकले नाहीत ते बालके हे जग सोडून गेले. या घटनेनंतर वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी. पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. बालकांचे आई-वडिल, नातेवाईकांच्या आक्रोशाने अनेकांच्या आश्रुंचा बांध फुटला.

पोटच्या बाळाला मनभरून पाहिलेही नव्हते

ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. ज्यांनी आपले पोटचे मुल गमावले त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या नवजात बालकांचे वजन कमी आहे. ज्यांना श्वास घेण्यास त्रास होतो अशा बालकांना एसएनसीयू वॉर्डमध्ये ठेवले जाते. या वॉर्डमध्ये बालकांजवळ आई रहात नाही. दिवसातून विशिष्ट वेळेस बालकाला स्तनपान करण्याची परवानगी आईला दिली जाते. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील ज्या 10 कोवळ्या जीवांनी प्राण सोडले त्यांच्या आई-वडिलांनी, आजी-आजोबा, आत्या, मावशीने भरभरून त्यांना पाहिलेली नव्हते. भंडारा जिह्यातील भोजापूर गावातील गीता आणि विश्वनाथ बोहेरे दाम्पत्याला लग्नानंतर अडीच वर्षांनी मुल झाले. गीताने गोंडस मुलीला 10 नोव्हेंबरला जन्म दिला. मुलीचे वजन कमी असल्याने शिशु केअर युनिटमध्ये उपचार सुरू होते. गीताने बुधवारी दुपारी 4 वाजता मुलीला शेवटचे बघितले. विश्वनाथने दोन महिन्यांत एकदाच मुलीला पाहिले होते. आज त्याने मुलीचा मृतदेह पाहिला. आपल्या बाळाला भरभरून पाहिलेलेही नाही हे सांगताना गीता आणि विश्वनाथने हंबरडा फोडला. अशीच अवस्था सर्व मृत बालकांच्या माता-पित्यांची आहे.

सात बालकांना वाचविण्यात यश

जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक प्रमोद खंदाते म्हणाले, शिशु केअर युनिटमध्ये 17 बालके होती. आग लागल्याचे पहिल्यांदा नर्सने पाहिले आणि डॉक्टर्स आणि इतर स्टाफला तत्काळ कळविले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सात बालकांना रेस्क्यू करून सुरक्षितपणे दुसऱया वॉर्डमध्ये हलविले. पण धुराचे लोट प्रचंड होते. 10 बालकांना दुर्दैवाने वाचवू शकलो नाही. वॉर्डमध्ये अग्निशमन यंत्रणा होती. आग विझवण्यासाठी या यंत्रणेचा वापर केला, अशी माहिती त्यांनी दिली.

तीन दिवसांत अहवाल

डारा जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती शासनाला तीन दिवसांत अहवाल सादर करेल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या समितीमध्ये संबंधित विषयांच्या तज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण रुग्णालयाचे फायर एक्स्टींग्विश आणि इतरही सुरक्षात्मक बाबींचे ऑडिट अशा सर्व बाबींची ही समिती चौकशी करेल, असे टोपे म्हणाले.

राष्ट्रपतींकडून शोक

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या आई-वडिलांचे राष्ट्रपतींनी सांत्वन केले आहे.

पंतप्रधानांकडून सहवेदना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेद्दल दुःख व्यक्त केले आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो, असे मोदींनी म्हटले आहे.

पाच लाख रुपयांची मदत

मृत्युमुखी पडलेल्या दहा बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.