मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 17 फेब्रुवारीला भराडी देवीच्या दर्शनाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. 17 व 18 फेब्रुवारी या दोन दिवसांच्या दौऱ्यात आंगणेवाडी यात्रोत्सवात भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी 18 फेब्रुवारीला किल्ले सिंधुदुर्गवर जाऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर चिपी विमानतळाच्या कामाची पाहणी, तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीनही जिह्याच्या विकासाची आढावा बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

सोमवारी 17 फेब्रुवारी सायंकाळी 4 वाजता आंगणेवाडी यात्रोत्सवात श्री देवी भराडी देवीचे दर्शन मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता मालवण तारकर्ली येथील एमटीडीसी स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे सिंधुदुर्गसह कोकणातील विकासकामांबाबत आढावा घेणार आहेत. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री अदिती तटकरे हेही उपस्थित असणार आहेत.

किल्ले सिंधुदुर्ग भेट; चिपी विमानतळ पाहणी

मंगळवार 18 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किल्ले सिंधुदुर्गला भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे रत्नागिरी जिह्यातील विकासकामांबाबत आढावा बैठक, दुपारी 1 वाजता रायगड जिह्यातील विकासकामांबाबत आढावा बैठक, त्यानंतर दुपारी 3 वाजता चिपी विमानतळाची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत.