
नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळत असताना अनेक दिग्गज नाटककार, नटांची आठवण येतेय. त्यापैकी काही जण अध्यक्ष होऊ शकले नाहीत. दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, सतीश आळेकर, श्रीराम लागू, विजय तेंडुलकर… याला कारण तुमची पद्धत… ‘निवडणूक’! असे परखड मत 100 व्या नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.
नाट्य परिषदेतर्फे आज डॉ. जब्बार पटेल यांचा सत्कार यशवंत नाट्यसंकुलात करण्यात आला. यावळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, प्रवक्ते मंगेश कदम, सदस्य मधुरा वेलणकर, आनंद खरबस उपस्थित होते. या सत्काराला उत्तर देताना डॉ. पटेल यांनी नाटय़ परिषदेच्या निवडणूक कार्यपद्धतीवर बोट ठेवले. ते म्हणाले, मी निवडणूक लढणार नाही असे परिषदेच्या मंडळींना आधीच सांगितले होते. ते त्यांनी मान्य केले. नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद हे मानाचे पद आहे. त्यासाठी अर्ज कसले घेता, ‘ज्ञानपीठ’ साठी कुणी निवडणूक घेतं का, असा सवाल पटेल यांनी केला.
डॉ. पटेल पुढे म्हणाले, नाटय़संमेलनाचा सोहळा दिमाखात पार पडतो. त्यात जर अभ्यासपूर्णता आणली तर या सोहळ्याला झळाळी प्राप्त होईल. शंभर तरुण जरी वेगळा विचार करू लागले, त्यातून काही तरी वेगळं झालं तर संमेलनाला ऍकॅडमिक स्वरूप प्राप्त होईल, मराठी नाटकं कुठे आहेत, याचा शोध आज घ्यायचा आहे. मराठी नसलेल्या लोकांनी मराठी नाटक बघितले पाहिजे. मराठी रंगभूमी समृद्ध आहे असे आपण म्हणतो. नाटय़ परिषद याच्यावरच समाधानी आहे का? मुंबईत फार कमी इतर भाषांमधील नाटकं येतात. भाषांच्या देवाणघेवाणीत खूप आव्हानं आहेत. याकरिता नाटय़ परिषद काम करेल, असा विश्वास डॉ. पटेल यांनी व्यक्त केला. इंडिया थिएटर फेस्टिव्हल ही संकल्पना साकार करण्यासाठी नाटय़ परिषदेने काम करायला हवे. नाटय़ परिषदेने नाटकांचे महोत्सव केले पाहिजेत. परदेशी दिग्दर्शकांच्या कार्यशाळा घेतल्या पाहिजेत असे सांगत प्रायोगिक नाटकांच्या तालमीला जागा नसल्याच्या विषयाकडेही लक्ष वेधले.
वयाच्या आठव्या वर्षी चेहऱयाला रंग लागून स्टेजवर उभा राहिलो. त्यावेळी पहिल्या वाक्यावर झालेला टाळ्यांचा कडकडाट कधीच विसरलो नाही. प्रायोगिक नाटक रक्तात आहे. नाटक जात नाही. मी खूप नाटकं केलीत असा दावा नाही. 8-10 नाटकं मनापासून केलीत. तेंडुलकरांनी ‘घाशीराम कोतवाल’नंतर नाटक दिलं नाही. तू करावंस असं नाटक नाही, असे ते मला म्हणायचे. 4-5 वर्षांनी पुलंनी ‘तीन पैशांचा तमाशा’ दिला. डॉ. श्रीराम लागू यांच्या सहवासाबद्दल सांगण्यासाठी शब्दच नाहीत, अशा आठवणी डॉ. पटेल यांनी जागवल्या. आताच्या पिढीमध्ये खूप टॅलेंट आहे. खूप छान लिहितात. त्यांच्यातील नट प्रगल्भ होत चाललाय, असे ते म्हणाले.
जब्बार पटेल यांनी नाटक, चित्रपट, फिल्म फेस्टिव्हल असे चौफेर काम केलेय. त्यांच्या या अनुभवाचा फायदा नाटय़ परिषदेला होईल. पु. ल. अकादमीचे संचालकपदही त्यांनी भूषवले आहे. या प्रशासकीय अनुभवाचाही फायदा होईल. त्यांनी नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले हे आमच्या कार्यपद्धतीवर त्यांनी केलेले शिक्कामोर्तब आहे असे मी समजतो, अशा भावना प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केल्या.
निवडणुकीचे अर्ज कसले घेता?
सध्या देशात नोंदणीचा विषय सुरू आहे. नागरिकांकडून सर्टिफिकेट घेतली जात आहेत. तसंच काहीसं संमेलन अध्यक्षपदासाठी अर्ज घेतले जातात. त्यातून तुम्ही आधी कुठे काम केलंय, दिग्दर्शक म्हणून पहिले नाटक कोणते अशी माहिती घेतली जाते. नटाचं, नाटककाराचं अख्खं आयुष्य तुमच्यासमोर असतं. मग अर्ज कसले घेता? असा सवाल डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केला.

























































