
येत्या दोनच वर्षांत लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. 2024च्या निवडणुकांसाठी भाजप आपली रणनीती आखत आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांची एक टीम बनवल्याची माहितीही मिळत आहे.
इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने रणनीती आखली आहे. त्यासाठी ज्येष्ठ नेत्यांचं एक पथक बनवण्यात आलं आहे. तसंच देशभरात 74 हजार पोलिंग बुथवर भाजप लक्ष केंद्रित करणार असून तेथील परिसरात आपला प्रभाव पाडणाचा भाजपचा मनसुबा आहे. या अशा जागा आहेत, जिथे भाजपला अजून विजय पक्का करता आलेला नाही.
भाजपने बनवलेल्या या टीमच्या एका सदस्याच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलं आहे. या सर्व बुथवर नियोजनपूर्वक योजना राबवण्यात येतील. हे सर्व बुथ हे दुर्गम भागात असून तिथे भाजपला मजबुती देण्याचं उद्दिष्ट या टीमसमोर आहे. याखेरीज उर्वरित भागातही प्रभाव कायम राहावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
त्याखेरीज 100 अशा जागा आहेत तिथे पक्षाला कधीही विजय मिळालेला नाही. तिथेही याची कारणमीमांसा करण्यात येऊन चित्र बदलण्याचे प्रयत्न होणार आहेत, असं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. या टीममध्ये भाजपचे महासचिव सी. टी. राव, दिलीप घोष आणि पक्षाचे अनुसूचित जाती शाखेचे प्रमुख लाल सिंह आर्य यांचा सहभाग असणार आहे. येत्या तीन महिन्यांत हे पथक देशव्यापी दौरा करणार आहे.
या टीमची एक बैठक भाजप मुख्यालयात पार पडली असून रणनीतीवर चर्चा सुरू आहे. रणनीती आखून झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या योजनेची अधिकृत सुरुवात करतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील आठवड्यात मिशन लोकसभा 2024ला सुरुवात होईल, असंही या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
























































