केंद्राच्या काळय़ा कायद्यांना वाकवणारी भारतीय किसान युनियन अखेर फुटली; टिकैत यांची हकालपट्टी, अराजकीय संघटनेची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी तीन काळय़ा कायद्यांना कडाडून विरोध करून ते मागे घ्यायला भाग पाडणारी देशभरातील शेतकऱयांची संघटना असलेल्या भारतीय किसान युनियनमध्ये (बीकेयू) फूट पडली असून अध्यक्ष नरेश टिकैत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. राजेशसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भारतीय किसान युनियन (अराजकीय) या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

देशभरातील शेतकऱयांच्या हितासाठी चौधरी महेंद्रसिंह टिकैत यांनी स्थापन केलेली भारतीय किसान युनियन ही संघटना वर्धापन दिनीच फुटली आहे. अध्यक्ष नरेश टिकैत आणि त्यांचे भाऊ प्रवक्ता राकेश टिकैत यांची हकालपट्टी करण्यात आली असून अध्यक्ष राजेशसिंह चौहान बनले आहेत. राजेशसिंह चौहान यांनी संघटनेतील फुटीनंतर भारतीय किसान युनियन (अराजकीय) संघटना स्थापन केली आहे. दरम्यान, संघटनेत फूट पडू नयेत म्हणून गेल्या दोन दिवसांपासून राकेश टिकैत हे लखनौमध्ये होते, मात्र संघटनेतील फुट ते रोखू शकले नाहीत.

राजकीय संघटना बनू पाहत होती
नरेश आणि राकेश दोन्ही भावांची भूमिका ही पूर्णपणे राजकीय होती. इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत एका पक्षाला मतदान करण्याचे आवाहनही टिकैत बंधूंनी केले होते. टिकैत यांच्या नेतृत्वामुळे ही संघटना शेतकऱयांच्या प्रश्न आणि समस्यांपासून दूर जात होती. ही संघटना राजकीय संघटना बनू पाहत होती, असा आरोप भारतीय किसान युनियन (अराजकीय) संघटनेचे अध्यक्ष राजेशसिंह चौहान यांनी केला आहे.