राज्यात ‘भेल’मार्फत दहा ऑक्सिजन प्लाण्ट उभे राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील कोरोनाच्या दुसऱया लाटेचा जोर ओसरत असला तरी सुरक्षिततेचा उपाय म्हणून भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात ‘भेल’मार्फत दहा ऑक्सिजन प्लाण्ट उभारण्याची तयारी राज्याच्या महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी सुमारे 12 कोटी 68 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

राज्यातील सण-उत्सव लक्षात घेता राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे असा इशारा केंद्र सरकारने दिला होता. गणेशोत्सव पार पडला आहे. आता दसरा आणि दिवाळीचा सण आहे. आता लॉकडाऊन शिथिल केला आहे. सणासुदीच्या काळात खरेदीसाठी दुकाने-मॉलमध्ये गर्दी होते. त्यामुळे संसर्गाच्या वाढीची भीती आहे आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेत दररोज चार हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. पण तरीही राज्य सरकार काळजी घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्याच्या आणि ऑक्सिजन प्लाण्ट उभारण्याच्या संदर्भात अलीकडेच राज्य कार्यकारी समितीची बैठक झाली होती. या बैठकीत केंद्र सरकारच्या प्राधिकरणामार्फत ऑक्सिजन प्लाण्ट लावण्यासाठी खरेदी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कौन्सिल ऑफ सायन्स ऍण्ड इंडस्ट्रीअल रिसर्चची (सीएसआयआर) प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्यात दहा ऑक्सिजन प्लाण्ट उभारण्याच्या सूचना ‘भेल’ला देण्यात आली. या दहा ऑक्सिजन प्रकल्पाची किंमत 12 कोटी 68 लाख रुपये आहे. त्यासाठी ‘भेल’ला 30 टक्के आगाऊ रक्कम म्हणून 3 कोटी 80 लाख 40 हजार रुपये आणि प्रकल्प व्यवस्थापक म्हणून सीएसआयआरला 1 लाख 18 हजार रुपये वितरित करण्यास महसूल व वन विभागाने मान्यता दिली आहे.

तिसऱया लाटेत दररोज चार हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज

राज्यात कोरोनाचा संसर्ग अत्युच्च शिखरावर होता तेव्हा दररोज एक हजार 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत होती. सध्या राज्यात ऑक्सिजनची क्षमता दोन हजार मेट्रिक टनांच्या आसपास आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेत दररोज चार हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल असा अंदाज आरोग्य यंत्रणांनी वर्तवला आहे आणि ऑक्सिजनची गरज वाढल्यास राज्यात पुन्हा लॉकडाऊनचा इशारा राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे.