भीम अ‍ॅप यूजर्सचा डाटा

1487

डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले भीम (बीएचआयएम) अ‍ॅपही सुरक्षित राहिलेले नाही असे दिसते आहे. कारण इथिकल हॅकर्सच्या एका गटाने असा दावा केला आहे की, यूपीआय पेमेंट भीम अ‍ॅपच्या वापरकर्त्यांशी संबंधित सुमारे ७२.६ लाख रेकॉर्ड्सही वेबसाइटवर सार्वजनिक झालेली आहेत. हॅकर्सच्या अहवालानुसार या लिक झालेल्या भीम अ‍ॅपच्या डेटाबेसमध्ये यूजर्सचे नाव, जन्म, लिंग, घराचा पत्ता, तारीख, वय, जात, आधार कार्ड तपशील आणि इतर संवेदनशील माहितीचा समावेश आहे.

व्हीपीएन सेंटरच्या सुरक्षा संशोधकांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ‘उघडकीस आलेल्या आकडेवारीची पातळी विलक्षण मोठी आहे, याचा परिणाम देशभरातील कोट्यवधी यूजर्सवर होणार आहे आणि भविष्यात ते सायबर फसवणूक, चोरी याबरोबरच हॅकर्स आणि सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य बनण्याची शक्यता आहे. भीम (बीएचआयएम) वेबसाइट केंद्र सरकारच्या सहकार्याने सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेड नावाच्या कंपनीने विकसित केली आहे. संशोधकांच्या मते या प्रकरणातील डेटा असुरक्षित अशा अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) एस-३ या बकेटमध्ये साठवण्यात आला होता. ही अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) एस-३ एक क्लाऊड सर्व्हिस असून ती जगभरात अत्यंत प्रसिद्ध आहे. मात्र असे असले तरी तिचा वापर करताना विकासकांना आपल्या खात्यावर सुरक्षा प्रोटोकॉल स्थापित करणे अत्यंत गरजेचे असते. परंतु लहान पेमेंट अॅप्लिकेशन चालवीत असलेल्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) स्पष्टीकरण दिले आहे की बीएचआयएम अ‍ॅपचा कोणताही डेटा सार्वजनिक झालेला नाही अथवा चोरीलाही गेलेला नाही. सर्वांना विनंती आहे की, अशा प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. एनपीसीआय त्यांच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी उच्चस्तरीय सुरक्षा आणि आधुनिक, सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यापुढेदेखील एक मजबूत पेमेंट इकोसिस्टीम म्हणून सेवा प्रदान करत राहील.

आपली प्रतिक्रिया द्या