भीमा–कोरेगाव प्रकरण : खटले मागे घेणार, पण अटींवर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती, पाणी टंचाई, महागाई, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांनी नाराजी तर दुसरीकडे राजकीय खटल्यांमुळे विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी लक्षात घेऊन भीमा-कोरेगाव व मराठा आरक्षणाच्या काळात दाखल झालेले खटले मागे घेण्यासाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीस समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही ठरावीक अटींवरच हे खटले मागे घेण्यात येणार आहेत.

राजकीय कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच केली आहे. आता याची व्याप्ती वाढवत भीमा-कोरेगाव व मराठा आरक्षणाच्या आंदोलनात दाखल झालेले खटले मागे घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या घटनेच्या वेळेस वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर जुलै, ऑगस्ट महिन्यांत मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन झाले होते. भीमा-कोरेगाव व मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात दाखल झालेले खटले मागे घेण्यासाठी राज्य सरकारला विनंती अर्ज सादर झाले आहेत.

त्याअनुषंगाने या दोन्ही आंदोलनांतील आंदोलकांवरील खटले मागे घेण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीमध्ये दोन महानिरीक्षकांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. काही अटींवर आंदोलकांवरील खटले मागे घेण्याची शिफारस राज्य सरकारला करील. हा अहवाल गृह विभागामार्फत मंत्रिमंडळ उपसमितीला सादर होईल. हा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राजकीय स्वरूपाचे दाखल असलेले खटले मागे घेण्यासाठी पूर्वी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात 5 लाख रुपयांपर्यंतचे नुकसान झालेले खटले मागे घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक रकमेचे सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले असल्यास खटला मागे घेतला जाणार नाही. मात्र भीमा-कोरेगाव व मराठा आरक्षण आंदोलनाच्या अनुषंगाने नव्याने काढलेल्या आदेशात नुकसानीच्या आकडय़ाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.

10 लाख रुपयांपर्यंत व्याप्ती वाढवली
या आंदोलनाच्या काळात सार्वजनिक मालमत्तेची हानी 10 लाखांपर्यंत झाली असल्यास समिती त्यात तपास करील. खटला मागे घेण्यायोग्य असल्यास समितीमार्फत कळवले जाईल. नुकसानभरपाईची रक्कम भरण्याबाबत संबंधितांची लेखी संमती असल्यास खटला मागे घेण्याबाबत समिती विचार करील. एकापेक्षा अधिक व्यक्ती त्यात असल्यास ही रक्कम सम प्रमाणात व सर्वसहमतीने वसूल करण्यात येईल.

केसेसची आकडेवारी
भीमा-कोरेगाव घटना – सुमारे 900 केसेस. त्यातील फक्त 50 केसेस गंभीर स्वरूपाच्या.
मराठा आरक्षण आंदोलन – 3 हजारांपेक्षा अधिक केसेस.

summary- bhima koregaon cases will be withdraw with some conditions